
बॉलिवूड अभिनेत्री या कायमच त्यांच्या बोल्ड आणि ब्युटीफूल लूकसाठी ओळखल्या जातात. अनेकदा अभिनेत्री चित्रपटातील एखाद्या सीनसाठी हॉट लूक करतात. मग त्यासाठी कधी त्या बिकीनी परिधान करतात तर कधी शॉर्ट कपडे परिधान करतात. पण 90च्या दशकातील एका अभिनेत्रीने नुकताच तिचा कपड्यांशी संबंधीत अनुभव शेअर केला आहे. तिने एकदा घातलेल्या कपड्यांमुळे तिला अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ओरडा खावा लागला होता. आता नेमकं काय घडलं होतं? चला जाणून घेऊया…
नेमकं काय घडलं?
आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत ती दुसरीतिसरी कोणी नसून जिनत अमान आहे. त्या सध्या रुपेरी पडद्यावर फारशा सक्रिय नसल्या तरी सोशल मीडियावरील पोस्ट्सच्या माध्यमातून चाहत्यांची मने जिंकत असतात. गुरुवारी त्यांनी इन्स्टाग्रामवर ‘द ग्रेट गॅम्बलर’ सिनेमामधला एक सीन शेअर केला आहे. या सिनेमाशी संबंधित आठवण सांगताना त्यांनी लिहिलं की कधीकधी त्या आपल्या जुन्या चित्रपटांच्या क्लिप्स पाहत बसतात. त्यात ‘द ग्रेट गॅम्बलर’मधला अमिताभ बच्चन आणि स्वतःचा एक सीन सापडला. या सीनमध्ये एक मुलगा त्यांची छेड काढतो. जनित त्या मुलाला पोलीस स्टेशनला घेऊन जातात, पण तिथे अमिताभ बच्चन अभिनेत्रीलाच डिवचतात आणि म्हणतात, “तू जे कपडे घातलेस त्यामुळे मुलं असं करतात.”
“दृष्टिकोन नक्कीच बदलला”
त्या पुढे म्हणाल्या, “जेव्हा आपण तरुण होतो तेव्हा वाटायचं की समाजाचे हे कठोर नियम कधीच बदलणार नाहीत, आपण कितीही बंडखोरी केली तरी. पण हळूहळू दिवस पुढे सरकत गेले आणि एक दिवस स्क्रीनकडे पाहायचं सोडून खऱ्या जगाकडे पाहिलं तर लक्षात आलं, अरे, खूप काही बदललंय.” पुढे त्या म्हणाल्या, “ठीक आहे, सर्व काही बदलत नाही. आजही काही नैतिकतेचे ठेकेदार आहेत. तरीही लोकांचा विचार करण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला आहे.”
जीनत अमान यांनी स्त्रियांना प्रश्न विचारला की जर तुम्ही ही क्लिप पाहिली असेल तर सांगा, त्या मुलाच्या छेडछाडीमुळे तुम्हाला राग आला का? तुम्हाला अस्वस्थता आणि राग आला का आणि सर्वात जास्त राग त्या इन्स्पेक्टरवर आला का जो ‘तूच बोलावतेस’ असा टोमणा मारतो?
आजच्या मुलींच्या धैर्यावर त्या खूश आहेत. त्या म्हणाल्या, “मी हा सीन एका तरुण मुलीला दाखवला. तिने इन्स्पेक्टर विजयकडे पाहून म्हटलं, ‘काय लूजर आहे यार!’ हे ऐकून मला हसू अनावर झाले. आज मी स्वतः जास्त व्यावहारिक विचारांची झाले आहे. मी पूर्णपणे मानते की प्रत्येकाला आपल्या आवडीचे कपडे घालण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण हेही खरं की जग अजून आपल्या विचारांवर चालत नाही. काही कपडे काही ठिकाणी जास्त योग्य वाटतात. ही विचारसरणी जुनी झाली का? कदाचित हो… पण माझे सगळे केस पांढरे झाले आहेत, म्हणून थोडं समजून घ्या.”