Amitabh Bachchan: आता कठीण होतंय.., अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने चाहत्यांना धक्का; केबीसी सोडणार बिग बी?
KBC: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून 'कौन बनेगा करोडपती'चं सूत्रसंचालन करत आहेत. मात्र नुकत्याच एका ब्लॉगमध्ये त्यांनी शोमधून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

अमिताभ बच्चन हे नाव ‘कौन बनेगा करोडपती’शी गेल्या अनेक वर्षांपासून घट्ट जोडलं गेलं आहे. मात्र आता बिग बींच्या एका भावनिक पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अमिताभ बच्चन KBCच्या होस्टिंगमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहेत का? असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. सध्या KBC 18 सुरू असतानाच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये शो होस्ट करणं भावनिकदृष्ट्या कठीण होत असल्याचं म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये केबीसीच्या हॉटसीटवर येणाऱ्या काही स्पर्धकांच्या आयुष्यातील संघर्षांविषयी लिहिलं. अनेक स्पर्धक आपल्यासोबत अतिशय गंभीर आणि वेदनादायक अनुभव घेऊन येतात. त्यांच्या कहाण्या ऐकल्यानंतर स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि त्याच वेळी कार्यक्रमाचा होस्ट म्हणून पुढे काम करणं कठीण होत असल्याचं बिग बींनी सांगितलं.
बिग बींनी त्यांच्या भावना व्यक्त करताना हा अनुभव हृदय पिळवटून टाकणारा असल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांनी ‘आता मला निवृत्त व्हावंसं वाटतंय’ अशा आशयाचं वक्तव्य केलं. त्यांच्या या शब्दांमुळे केबीसीच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. केबीसी हा केवळ प्रश्न आणि उत्तरांचा गेम शो राहिलेला नाही. हॉटसीटवर येणारे स्पर्धक अनेकदा आपल्या आर्थिक अडचणी, कौटुंबिक परिस्थिती आणि आयुष्यातील संघर्ष प्रेक्षकांसमोर मांडतात. अमिताभ बच्चन हे त्यांच्याशी संवाद साधताना अनेकदा भावूक होताना दिसतात.
यंदाच्या सिझनमध्येही काही स्पर्धकांनी अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत शोमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांच्या कहाण्या ऐकताना अमिताभ यांच्यावर भावनिक परिणाम होत असल्याचं त्यांच्या ब्लॉगमधून स्पष्ट झालं आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ची सुरुवात 2000 मध्ये झाली आणि पहिल्या सीझनपासून अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचा चेहरा बनले. केवळ तिसरा सिझन वगळता त्यांनी जवळपास प्रत्येक सिझनचं सूत्रसंचालन केलं आहे. तिसऱ्या सिझनमध्ये शाहरुख खानने होस्टची भूमिका निभावली होती. त्यानंतर अमिताभ पुन्हा या शोमध्ये परतले आणि केबीसीचा अविभाज्य भाग बनले.
सध्या ‘केबीसी 18’चं प्रसारण सुरू आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या ‘निवृत्ती’च्या वक्तव्यामुळे हा त्यांचा शेवटचा सिझन ठरणार का, असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे. मात्र अमिताभ बच्चन यांनी KBC सोडण्याचा अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या ब्लॉगमधील वक्तव्याकडे भावनिक प्रतिक्रिया म्हणूनही पाहिलं जात आहे.