घरात आणखी एका टीकाकाराची गरज नाही.. रणबीर कपूरच्या प्रश्नावर अमिताभ बच्चन यांचं मन जिंकणारं उत्तर !

'रामायण' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणबीर कपूरने KBC मध्ये अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. यावेळी रणबीरने अमिताभ यांना अभिषेक बच्चनसोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल विचारलं. रणबीरने त्यावेळच्या वडील-मुलाच्या नात्यातील भावनिक बंधाची आठवण करून दिली.

घरात आणखी एका टीकाकाराची गरज नाही.. रणबीर कपूरच्या प्रश्नावर अमिताभ बच्चन यांचं मन जिंकणारं उत्तर !
| Updated on: Oct 30, 2026 | 7:57 PM

मोठ्या पडद्यावर लौकरच रिलीज होणाऱ्या ‘रामायण’ या आगामी चित्रपटामुळे अभिनेता रणबीर कपूर बराच चर्चेत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तो नुकताच साई पल्लवी आणइ रवि दुबे याच्यासह ‘कौन बनेगा करोडपति’ या प्रसिद्ध क्विझ शोमध्ये पोहोचला होता. त्यावेळी तिघांनी शोचे होस्ट अमिताभ यांच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. त्याचदरम्यान बोलताना रणबरीने अमिताभ यांना विचारलं, ” मी -अभिषेक एकत्रच मोठे झालो. तुम्हाला अभिषेकची एखादी गोष्ट आवडायची किंवा न आवडायची, तेव्हा तुम्ही त्याला थेट तसं सांगायचात का की जया बच्चन यांच्यातर्फे तुमचं म्हणणं पोहोचवायचात? कारण माझे बाबा माझ्या आईच्या माध्यमातून माझ्या बोलायचे. तुमची काय पद्धत होती?” असं पुढे रणबीरने विचारलं.

मी कधीच अभिषेकवर टीका केली नाही

Loading...

रणबीर कपूरच्या या प्रश्नाचं अमिताभ बच्चन यांनी अतिशय संयतपणे, पण स्पष्ट उत्तर दिलं. “ बाहेर आधीच लाखो लोक टीका करण्यासाठी आहेत. त्यामुळे घरात आणखी एका टीकाकाराची गरज नाही, असं मला वाटतं. मी कधीही अभिषेकवर टीका केली नाही, त्याला फक्त आशीर्वादच दिले. मी त्याला नेहमी सांगितलं की, एखादा चित्रपट चालला नाही तर काही हरकत नाही. तू आणखी चित्रपट करशील आणि तुला पुढेही काम मिळत राहील” असं बिग बी यांनी नमूद केलं.

“ मी त्याच्याशी नेहमी संवाद साधत राहीलो आणि त्याला आशीर्वाद दिले, पण कधीही त्याच्यावर टीका केली नाही. अभिषेकसारख्या काही लोकांना वाटतं की, त्यांच्यावर टीका व्हायला हवी. कारण त्यामुळे आपण काय योग्य किंवा अयोग्य करत आहोत, हे समजण्यास मदत होते. तसेच आपल्या चुका सुधारण्याची संधीही मिळते. मात्र, मी कधीही त्याला तू काही चुकीचं केलं आहेस, असं म्हटलं नाही” असंही अमिताभ बच्चन यांनी पुढे नमूद केलं.

त्या काळात वडील आणि मुलाच्या नात्यात काहीसं अंतर असायचं

अमिताभ बच्चन यांचं बोलणं ऐकल्यावर रणबीरने त्यांचं कौतुक केलं. एवढंच नव्हे तर अभिषेक बच्चनशी निगडीत एक जुना किस्साही सांगितला. रणबीर म्हणाला, “ अभिषेक मला नेहमी सांगायचा की, जेव्हा तो स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेत होता, तेव्हा तुम्ही कामात प्रचंड बिझी असायचा. मात्र, त्याचा एखादा कार्यक्रम किंवा आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असेल, तर तुम्ही आवर्जून तिथे पोहोचायचा. त्यानंतर अवघ्या दोन तासांतच पुन्हा स्टुडिओमध्ये कामावर जाण्यासाठी तुम्ही विमान पकडायचात.”

पुढे रणबीर म्हणाला, “ मला वाटतं की, त्या काळात तुम्ही वडील म्हणून खूप प्रामाणिक प्रयत्न केलेत. त्या काळात वडील आणि मुलाच्या नात्यात अनेकदा काहीसं अंतर असायचं. मात्र,माझे वडील कितीही व्यस्त असले तरी माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या क्षणासाठी वेळ काढायचे, असं अभिषेक नेहमी सांगायचा” असंही रणबीरने नमूद केलं.

‘रामायण’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारीने केलं असून नमित मल्होत्रा प्रोड्यूसर आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर , साई पल्लवी, रवि दुबे, सनी देओल, रकुल प्रीत सिंह, काजल अग्रवाल, विवेक ओबेरॉय, कुणाल कपूर, आदिनाथ कोठारे, अरुण गोविल, इंदिरा कृष्णन आणि लारा दत्ता हे कलाकार महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. येत्या 5 नोव्हेंबरला रामायण रिलीज होणार असून दुसरा भाग पुढल्या वर्षी रिलीज होऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us