IMD rain alert : आयएमडीचा मोठा इशारा, पुढील 24 तासांत पाऊस दाणादाण उडवणार, महाराष्ट्रातही चिंता वाढली
पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. आयएमडीकडून तब्बल 23 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यता आला आहे. पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार असून, सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

मान्सूनचा पाऊस माघारी परतला आहे. मात्र आता पु्न्हा एकदा भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नव्या इशाऱ्यामुळे टेन्शन वाढलं आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार देशासह राज्यात उद्या 31 ऑगस्ट रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रासह 23 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र केवळ मुसळधार पावसाचं संकट एकटंच नसून त्यासोबतच वादळी वाऱ्याचं देखील मोठं संकट असणार आहे. या काळात ताशी 100 किमी प्रति तास वेगाच्या आसपास वारे वाहणार असल्याचा इशारा देखील भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका हा ओडिशा, आंध्र प्रदेश, बिहार, आणि छत्तीसगड या चार राज्यांना बसणार आहे, असा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
यंदा देशात एल निनोचा प्रभाव पाहायला मिळत आहे, एल निनोमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनचा पाऊसच झालेला नाही, त्यामुळे आधीच शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान त्यानंतर आता तब्बल 23 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्यामुळे जी पिके आली आहेत, त्यांचं देखील मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण ही पिके आता काढणीच्या हंगामात असल्यामुळे ती भिजून त्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून उत्तरेकडील राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पाच राज्यांमध्ये बर्फ वृष्टी होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर हरियाणामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या 23 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
पुढील 24 तासांमध्ये 23 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, केरळ, तामिळनाडू, आसाम, त्रिपुरा, आणि सिक्कीम या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या काळात 90 ते 95 किमी वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता आहे.
महाराष्ट्रात काय परिस्थिती?
महाराष्ट्रातही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथा या प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता आहे. सोबतच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, काही भागात गारपीटीची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
