
अभिनेत्री तारा सुतारियाचा मुंबईतील एका कॉन्सर्टमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तारा आणि तिचा बॉयफ्रेंड वीर पहारिया हे मुंबईत एपी ढिल्लोच्या कॉन्सर्टला पोहोचले होते. एपी ढिल्लोच्या एका म्युझिक व्हिडीओमध्ये झळकल्याने ताराने त्याच्यासोबत कॉन्सर्टमध्ये स्टेज शेअर केला होता. स्टेजवर तिने एपीला मिठी मारली आणि त्याच्या गालावर किस केलं. त्यानंतर त्यानेही तिला मिठी मारत किस करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व घडताना वीर पहारियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाल्याचं व्हिडीओमध्ये पहायला मिळालं होतं. अनेकांनी त्यावरून मीम्स व्हायरल केले. आता त्यावर ताराने अखेर मौन सोडलं आहे. ताराने तिच्या सोशल मीडियावर कॉन्सर्टमधील खरा व्हिडीओ शेअर केला.
‘हे सर्व फेक आणि एडिटेड आहे’, असं स्पष्ट करत तिने कॉन्सर्टमधील खरा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ताराने असाही आरोप केला आहे की तिच्याविरोधात नकारात्मक पीआर मोहीम राबवली जात आहे. तिला बदनाम करण्यासाठी असे अपमानास्पद कॅप्शन बनवण्यात आल्याचा दावा तिने केला आहे.
एका कंटेंट क्रिएटरने एपी आणि ताराचा खरा व्हिडीओ सर्वांना दाखवला आहे आणि तोच व्हिडीओ ताराने तिच्या अकाऊंटवर शेअर केला. त्यावर संबंधित कंटेंट क्रिएटरला धन्यवाद म्हणत तिने लिहिलं, ‘हे सर्व हाइलाइट करण्यासाठी आणि सत्य समोर आणण्यासाठी धन्यवाद. हे सर्व पैसे देऊन एडिट करवून घेतले आहेत. माझा अपमान करण्यासाठी हे सर्व करण्यात आलं आहे. हे अत्यंत घृणास्पद आहे की त्यांनी शेकडो कंटेंट क्रिएटर्स आणि हजारो मीम पेजेसना पाठवण्यासाठी अपमानास्पद कॅप्शन आणि चर्चेच्या पॉईंट्सची एक यादीच तयार केली होती. हे सर्व माझं करिअर आणि नातं उद्ध्वस्त करण्यासाठी केलंय का? या सर्वांची खिल्ली उडवणाऱ्यांचा चेहरा आता समोर येत आहे. त्यांच्यावरच ही मस्करी भारी पडतेय.’
या व्हिडीओमध्ये कंटेंट क्रिएटरने सांगितलं की 6 हजार रुपयांच्या बदल्यात तिला काही पॉईंट्सची यादी पाठवण्यात आली होती. त्या आधारावर तिला तारा सुतारियाच्या विरोधात कंटेंट बनवण्यास सांगण्यात आलं होतं. त्या यादीत एकूण आठ मुद्दे होते, त्याच्या आधारवर ताराची प्रतिमा मलिन करण्यासाठी तिला कंटेंट बनवायला सांगितलं होतं. या व्हिडीओवर कमेंट करत ताराने आपला आवाज उठवला आहे.
ताराचा बॉयफ्रेंड वीर पहारिया हा स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा मुलगा आहे. वीरचा मोठा भाऊ शिखर पहारिया हा अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड आहे.