
संगीतकार ए. आर. रेहमान हे फार क्वचित त्यांच्या खासगी आयुष्याविषयी व्यक्त होतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते त्यांच्या वडिलांबद्दल बोलताना भावूक झाले होते. कमी वयात वडिलांना गमावल्यामुळे त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला आणि त्यानंतर आईने प्रत्येक पावलावर कशी साथ दिली, याविषयीही त्यांनी सांगितलं. निखिल कामथच्या पॉडकास्टमध्ये रेहमान यांना त्यांच्या चेन्नईतील बालपणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मी माझ्या आयुष्यातील बराच काळ चेन्नईमध्येच घालवला आहे. माझा जन्म तिथलाच आहे आणि माझे वडील स्टुडिओत काम करायचे. आम्ही कोडंबक्कमजवळ राहत होतो. त्याठिकाणी सर्व स्टुडिओ होते.”
पुढे रेहमान यांनी त्यांचे वडील आर. के. शेखर यांच्याविषयी सांगितलं की, कशा पद्धतीने सतत काम करून त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला आणि अकाली निधन झालं? ते पुढे म्हणाले, “माझ्या आईवडिलांना त्यांच्या कुटुंबीयांनी घरातून हाकललं होतं. नंतर ते भाड्याच्या घरात राहू लागले होते. माझे वडील दिवसरात्र मेहनत करायचे. एकाच वेळी ते तीन-तीन नोकऱ्या करत होते आणि त्यामुळेच त्यांची तब्येत खूप बिघडली होती. माझ्या बालपणातील तो सर्वांत अंध:काराचा काळ होता. त्या धक्क्यातून सावरण्यासाठी मला बराच वेळ लागला.”
पतीच्या निधनानंतर ए. आर. रेहमान यांच्या आईने चार मुलांचं पालनपोषण केलं. “मी नऊ वर्षांचा असताना वडिलांचं आणि आजीचं निधन झालं होतं. प्रत्येक दिवस माझ्यासाठी जणू ट्रॉमा असायचा. माझी आई एकटी पडली, परंतु तरीही ती खंबीर होती. आईने एकटीनेच सर्व समस्या झेलल्या होत्या. तिच्याच प्रचंड आत्मविश्वास होता. तिने सर्व प्रकारचे अपमान सहन केले आणि आम्हाला लहानाचं मोठं केलं. माझं संगीतविश्वात येण्याचा निर्णय आईनेच घेतला होता,” असं त्यांनी सांगितलं.
ए. आर. रेहमान यांना त्यांचं बालपण इतरांप्रमाणे जगता आलं नाही. लहान वयातच त्यांनी संगीताचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. तासनतास ते स्टुडिओमध्ये वेळ घालवायचे. याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “घरच्या परिस्थितीमुळे मी संगीत शिकण्यात स्वत:ला इतकं झोकून दिलं होतं की त्यामुळे मला माझं बालपण इतरांप्रमाणे जगता आलं नाही. माझं संपूर्ण बालपण 40-50 वर्षांच्या लोकांसोबत स्टुडिओमध्ये गेलं. शाळेत मित्रांसोबतची मस्ती, कॉलेजचं वातावरण.. या सर्वांचा अनुभव मला कधी घेताच आला नाही. बरंच काही हातातून निसटून गेलं. परंतु स्टुडिओमध्ये मला खूप समजूतदार आणि बुद्धिमान लोकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली.”