
बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खानने नुकताच त्याच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त पत्नी शूरा खानने अरबाजसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. शुराने सोशल मीडियावर अरबाजचे काही व्हीडिओ शेअर केले आहेत. यामध्ये तो वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. परंतु यातल्या एका व्हीडिओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. हा व्हीडिओ पाहून नेटकऱ्यांना अरबाजची पूर्व पत्नी मलायका अरोराची आठवण आली आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शुरा खानने इंस्टाग्रामवर अरबाज खानच्या डान्सचे काही व्हीडिओ पोस्ट केले आहेत. यातील पहिल्या व्हीडिओमध्ये तो ‘शहजादा’ चित्रपटातील ‘तेरे लिए मैंने पहिली वाली छोड दी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ‘आज की रात और आई नही’ या गाण्यावर तो थिरकताना पाहायला मिळत आहे.
अरबाजच्या ‘तेरे लिए मैंने पहिली वाली छोड दी’ या गाण्याच्या डान्सवरील व्हिडिओवर नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं, ‘अरबाज रॉक मलायका शॉक’. तर दुसऱ्या युजरने थेट मलायकाला टॅग केलं आहे. ‘खरंच पहिल्या वालीला सोडून दिलंस,’ अशी कमेंट आणखी एका युजरने केली. ‘इतकं खरं बोलायचं नव्हतं’ असंही एका नेटकऱ्याने लिहिलं आहे. अरबाजचे हे व्हीडिओ शेअर करत शुरा खानने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘जेव्हा मी म्हणते की मला कंटाळा येत नाही तेव्हा मी काहीच वाढवून चढवून म्हणत नसते. दोन वर्षे… असंख्य व्हीडिओ आणि कधीच न संपणारं हास्य. तुझ्यासोबतचं माझं आयुष्य हे सर्वात सुंदर आहे. माझ्या जोडीदाराला आणि माझ्या आयुष्यातील प्रेमाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.’
शुरा खानच्या या पोस्टवर अरबाजनेही कमेंट केली आहे. ‘आता मी हे मानायला तयार आहे की शुरा तू माझ्यावर खरंच प्रेम करतेस. हॅप्पी एनिवर्सरी माय लव्ह,’ अशी प्रतिक्रिया अरबाज खानने दिली आहे. मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसरं लग्न केलं. काही दिवसांपूर्वीच शूरा आणि अरबाज आई-बाबा बनले. खान कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. तर दुसरीकडे मलायका अरोरा अजूनही सिंगल आहे. अभिनेता अर्जुन कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर तिचं नाव सध्या एका हिरे व्यापाऱ्याशी जोडलं जात आहे.