Ashish Vidyarthi | आशिष विद्यार्थी यांनी घटस्फोटानंतर पोटगी म्हणून दिली मोठी रक्कम? पूर्व पत्नीचा खुलासा

अभिनेते आशिष विद्यार्थी यांचं दुसरं लग्न हा विषय सोशल मीडियावर खूप चर्चेत होता. त्याचवेळी त्यांनी पहिली पत्नी पिलू विद्यार्थी यांना पोटगी म्हणून तगडी रक्कम दिल्याचंही म्हटलं गेलं. या चर्चांवर आता पिलू यांनी मौन सोडलं आहे.

Ashish Vidyarthi | आशिष विद्यार्थी यांनी घटस्फोटानंतर पोटगी म्हणून दिली मोठी रक्कम? पूर्व पत्नीचा खुलासा
पोटगीसंदर्भात आशिष विद्यार्थी यांच्या पूर्व पत्नीकडून खुलासा
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 06, 2023 | 7:34 PM

मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 57 व्या वर्षी दुसरं लग्न केलं. त्यांच्या या दुसऱ्या लग्नाची आणि पहिल्या पत्नीला दिलेल्या घटस्फोटाची जोरदार चर्चा झाली. 22 वर्षांच्या संसारानंतर आशिष आणि राजोशी बरूआ ऊर्फ पिलू विद्यार्थी विभक्त झाले होते. या दोघांच्या घटस्फोटावरून अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. त्यातूनच अशीही चर्चा सुरू झाली की, घटस्फोटानंतर पिलू यांना आशिष यांच्याकडून पोटगी म्हणून खूप मोठी रक्कम मिळाली. पोटगीच्या या चर्चांवर आता पिलू यांनी मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पोटगीच्या चर्चांमागील सत्य सांगितलं आहे.

पोटगीबद्दलच्या चर्चांवर उत्तर

‘हिंदुस्तान टाइम्स’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “माझी जुनी मुलाखत खूप व्हायरल झाली आणि प्रत्येकाने त्यावर अशा प्रकारे चर्चा केली, जणू ते संसदेतच आहेत. त्यापैकी बहुतांश लोकांनी चांगल्याच गोष्टी म्हटल्या. मात्र 20-30 जण नकारात्मक कमेंट्स करू लागले. आपल्या आयुष्याला कंटाळलेली ही लोकं सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवत होते. मी पोटगीत तगडी रक्कम स्वीकारली, असंही काहींनी म्हटलंय. हे सर्व खोटं आहे, यांच्यात काहीतरी गडबड नक्कीच आहे, घटस्फोट काही इतका सोपा नसतो.. असं अनेकजण म्हणाले. पण आता या गोष्टींचा मी फारसा विचार करत नाही.”

घटस्फोटामागचं नेमकं कारण

याआधी दिलेल्या एका मुलाखतीत पिलू यांनी स्पष्ट केलं होतं की त्यांच्या घटस्फोटामागे काही विशेष कारण नव्हतंच. “लोकांना ठराविक समस्या शोधून काढायच्या असतात. पण आमच्या आयुष्यात तशी काही समस्याच नव्हती. यावर लोकांना विश्वासच बसत नाही. असं कसं होऊ शकतं, असा प्रश्न त्यांना पडतो. आमच्यात ठराविक कनेक्शन आहे, आपुलकी आहे. फक्त आमचे मार्ग एकत्र येत नाहीत. आम्ही जवळपास दीड वर्षे यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला आमचं भविष्य एकमेकांपासून वेगळंच दिसत होतं”, असं त्या म्हणाल्या होत्या.

“मी जगभरातील विविध कुटुंबांमध्ये हे पाहिलंय, की महिलांना पत्नीच्या भूमिकेतच कसं खुश राहावं ते शिकवलं जातं. पण त्यात मी खुश नव्हते. एक पत्नी म्हणून माझ्याकडून ज्या पतीच्या अपेक्षा आहेत, त्या मी पूर्ण करू शकत नव्हते. एका टप्प्यानंतर मी ही गोष्ट स्वीकारली होती. पण याचा अर्थ असा नाही की ते मला मारायचे, खोलीत बंद करायचे. असं काहीच नव्हतं,” असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.