
बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदी कलाकार असरानी यांते निधन झाले आहे. सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. असरानी यांचे पूर्ण नाव गोवर्धन असरानी होते. ते गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. आज दुपारी 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. असरानी यांचा जन्म 1 जानेवारी 1941 रोजी जयपूरमध्ये झाला. जयपूरमधील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. 1967 मध्ये ‘हरे कांच की चुडियाँ’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मात्र त्यांना सुरुवातीला एका कारणामुळे काम मिळत नव्हते. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
गोवर्धन असरानी यांनी आपल्या कारकिर्दीत 300 पेक्षा जास्त हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले. मात्र बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवने त्यांच्यासाठी सोपे काम नव्हते. कोमल नाहटाच्या एका शोमध्ये असरानी यांनी सांगितले होते की, लोक मला व्यावसायिक अभिनेता मानत नव्हते. गुलजार साहेब मला म्हणाले होते की तुझा चेहरा विचित्र आहे, मी तुला व्यावसायिक अभिनेता मानत नाही. त्यानंतर मी एकदा दिग्दर्शक एलव्ही प्रसादला भेटलो होता. त्यावेळी प्रसाद म्हणाले होते की, ‘तुम्ही हिरो किंवा विलेन सारखे दिसत नाहीत. त्यामुळे तुला कोणती भूमिका द्यावी?’
पुढ बोलताना असरानी म्हणाले की, “एलव्ही प्रसाद यांनी मला एक चित्रपट ऑफर केला. ते म्हणाला की, ‘असरानी, मी तुला कोणत्या प्रकारची भूमिका देऊ? कारण आमच्याकडे बरेच नायक आहेत, तू खलनायक दिसत नाहीस, तू रोमँटिक सीन्स करू शकत नाहीस. मला सांगा, मी तुला कोणती भूमिका देऊ?’ यानंतर मी म्हणालो, ‘मला माफ करा.’ आणि मी निघून गेलो.”
बॉलीवूडमध्ये काम न मिळाल्याने असरानी हे दक्षिणेकडे वळले. त्यांना तिथे काम मिळाले. त्यांना दक्षिण भारतातील प्रमुख अभिनेते आणि दिग्दर्शकांसोबत काम केले. त्यानंतर त्यांना हिंदी चित्रपटांमध्ये संधी मिळू लागली. बी.आर. चोप्रा यांनी त्यांना निकाह चित्रपटात काम दिले. लोकांनी सांगितले की ते या भूमिकेसाठी योग्य नाहीत, मात्र तरीही चोप्रा यांनी संधी दिली आणि नंतर चित्रपट हिट झाला.
यानंतर असरानी यांनी जवळजवळ पाच दशके बॉलिवूडमध्ये काम केले. त्यांनी “हम नहीं सुधरेंगे,” “दिल ही तो है,” आणि “उडान” या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. तसेच त्यांनी अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या शोलेमध्ये जेलरची भूमिका केली होती, यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती.