Azam Khan : सैफ-शाहरुखसाठी वेगळे कायदे आहेत का? लव्ह जिहादच्या मुद्द्यावर समजवादी पार्टीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
Azam Khan On Saif Ali Khan And Shah Rukh Khan Marriage : समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आजम खान आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. राजकीय मुद्दे असोत किंवा सामाजिक विषय, ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसतात. आता आझम खान यांनी ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावर केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांच्या आंतरधर्मीय विवाहांचा दाखला देत समाजाच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काय म्हणाले आझम खान?
आझम खान यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावर बोलताना अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या लग्नाचा उल्लेख केला. तसंच अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या लग्नाबद्दलही भाष्य केलं. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार जेव्हा वेगळ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करतात, तेव्हा संपूर्ण चित्रपटसृष्टी, समाजातील प्रतिष्ठित मंडळी आणि श्रीमंत लोक या लग्नाचा आनंद साजरा करतात. मात्र, एखाद्या सामान्य कुटुंबातील मुलगा-मुलगी आंतरधर्मीय विवाह करत असतील, तर त्याच गोष्टीवर आक्षेप घेतला जातो, असं आझम खान म्हणाले.
‘पण जेव्हा कोणी एखाद्या गावच्या मुलीशी लग्न करतो, तेव्हा बुलडोझर चालवला जातो. हा लव्ह जिहाद आहे. सेलिब्रिटींच्या लग्नांमध्ये लव्ह जिहाद का झाला नाही? कायदा कुठे गेला आहे? हा कायदा फक्त सामान्य गावकऱ्यांसाठी आहे का? सैफ अली खान आणि शाहरुख खानसाठी कोणतेही कायदे नाहीत. जर लग्नानंतर एखाद्या हिंदू मुलीचं जबरदस्तीने धर्मांतर केलं जात असेल, तर अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे. पण, हे कायदे फक्त गरिबांसाठी आहेत का? कायद्याचा हातोडा उच्चभ्रू व्यक्तींवरही वापरला पाहिजे.’ असं आझम खान म्हणाले.
दरम्यान, अनेक बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींनी आंतरधर्मीय लग्न केलं आहे. एक काळ असा होता जेव्हा सेलिब्रिटींमधील हिंदू-मुस्लिम विवाह वादग्रस्त मानले जात होते. शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांच्या लग्नाची अनेकांनी खिल्ली उडवली होती. आजही शर्मिला आणि मन्सूर यांच्या लग्नाची चर्चा होते.
