‘बाजीगर’मध्ये साकारली शाहरुखच्या बालपणीची भूमिका; अभिनय सोडून आता करतोय कोट्यवधींचा बिझनेस

'बाजीगर' या चित्रपटातील भूमिकेसाठी या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कारदेखील मिळाला होता. काही वर्षे अभिनयक्षेत्रात काम केल्यानंतर तो इंडस्ट्रीपासून दूर गेला. आता हा अभिनेता काय करतो, ते जाणून घ्या..

बाजीगरमध्ये साकारली शाहरुखच्या बालपणीची भूमिका; अभिनय सोडून आता करतोय कोट्यवधींचा बिझनेस
'बाजीगर' फेम बालकलाकार आणि शाहरुख खान
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 07, 2026 | 11:44 AM

नव्वदच्या दशकातील अनेक चित्रपटांमधील बालकलाकार आज कुठे आहेत, याची उत्सुकता प्रेक्षकांना कायम असते. ‘बाजीगर’ या गाजलेल्या चित्रपटात शाहरुख खानच्या व्यक्तिरेखेच्या बालपणीची भूमिका साकारणारा सुमित पाठक याचाही प्रवास असाच रंजक आहे. पडद्यावर बालकलाकार म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर सुमितने अभिनयापासून हळूहळू अंतर घेतलं आणि मनोरंजन क्षेत्रातीलच एका वेगळ्या वाटेवर पाऊल ठेवलं. आज तो अभिनयाऐवजी मीडिया आणि तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसाय उभारत आहेत.

‘बाजीगर’मधून मिळाली ओळख

सुमित पाठकने 1992 मध्ये ‘एक लड़का एक लड़की’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर वर्षभरातच त्याला ‘बाजीगर’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमात त्याने शाहरुख खानने साकारलेल्या अजय मल्होत्रा या व्यक्तिरेखेच्या बालपणीची भूमिका केली होती. भूमिका फार मोठी नसली तरी त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी सुमितला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ‘इक्के पे इक्का’, ‘राजकुमार’ आणि ‘माहिर’ यांसारख्या चित्रपटांमध्येही तो दिसला. अभिनयासोबतच त्याने शिक्षण आणि कलात्मक प्रशिक्षणाकडेही लक्ष दिलं. त्याने दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रशिक्षण घेतलं असून शास्त्रीय नृत्याचंही शिक्षण घेतलं.

Loading...

सलमान खानसोबतही केलं काम

बालकलाकार म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर सुमितने मोठं झाल्यावरही अभिनय सुरू ठेवला. 2002 मध्ये तो सलमान खानच्या ‘तुमको ना भूल पाएंगे’ या चित्रपटात दिसला. यामध्ये त्याने सलमानच्या भावाची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2004 मध्ये आलेल्या ‘टारझन: द वंडर कार’मध्येही त्याने काम केलं. मात्र, सुमितला खरी वेगळी ओळख मिळाली ती छोट्या पडद्यावर. ‘हीरो-भक्ति ही शक्ति है’ या लोकप्रिय मालिकेत त्याने जॉय सेहगल ही व्यक्तिरेखा साकारली. 2005 ते 2007 दरम्यान प्रसारित झालेल्या या मालिकेने विशेषतः लहान मुलांमध्ये लोकप्रियता मिळवली. त्याचबरोबर सुमितने ‘ऑस्वाल्ड’, ‘पॉवर रेंजर्स’, ‘रिची रिच’ आणि ‘बेब्लेड’ यांसारख्या एनिमेशन प्रोजेक्ट्ससाठी हिंदी डबिंगमध्येही काम केलं.

पहा फोटो

अभिनय सोडून सुरू केली स्वतःची कंपनी

पडद्यावर यश मिळूनही सुमितने पुढे अभिनयाऐवजी व्यवसायाची वाट निवडली. त्याने पत्नी श्वेता पाठकसोबत ‘गुलमोहर मीडिया’ या कंपनीची सुरुवात केली. सुरुवातीला कंपनीचं मुख्य काम वेगवेगळ्या भाषांमध्ये कंटेंटचं लोकलायझेशन करणं होतं. कालांतराने या व्यवसायाचा विस्तार पोस्ट-प्रॉडक्शन, कंटेंट निर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झाला. आज कंपनीचं काम मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईसह भारतातील सहा शहरांमध्ये विस्तारलं आहे. क्लाऊड-बेस्ड एडिटिंग आणि प्रोडक्शनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही कंपनी करते. याशिवाय ऑडिओ डिस्क्रिप्शन आणि साइन लँग्वेजसारख्या एक्सेसिबिलिटी सेवांमध्येही कंपनीने काम वाढवलं आहे.

‘सत्यमेव जयते’मुळे मिळाली मोठी ओळख

गुलमोहर मीडियाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे आमिर खान प्रॉडक्शन्सचा ‘सत्यमेव जयते’. या शोच्या विविध भाषांमधील लोकलायझेशनच्या कामामुळे कंपनीला मोठ्या स्तरावर ओळख मिळाली. पुढे कंपनीने भारतीय एनिमे प्रोजेक्ट्सवरही काम सुरू केलं असून फ्रान्स आणि जर्मनीतील कंटेंट दक्षिण-पूर्व आशियातील प्रेक्षकांसाठी तयार करण्याच्या दिशेनेही विस्तार केला आहे. अशाप्रकारे ‘बाजीगर’मधील छोट्या भूमिकेपासून सुरू झालेला सुमित पाठकचा प्रवास आज अभिनयापलीकडे जाऊन मीडिया-टेक उद्योजक म्हणून नवी ओळख निर्माण करणारा ठरला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us