
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) हिने शुक्रवारी व्यावसायिक गौतम हाथीरमानी याच्याशी लग्नगाठ बांधली. लंडनमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. कनिकाचं हे दुसरं लग्न आहे.

लग्नसोहळ्यात वर-वधूसह पाहुण्यांनीसुद्धा पेस्टल रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मीत ब्रोजच्या जोडीतील गायक मनमीत सिंगने या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. मनमीत आणि कनिकाने मिळून अनेक हिट गाणी गायली आहेत. 'बेबी डॉल' हे त्यापैकीच एक गाणं आहे.

गौतम हा लंडनमध्ये व्यावसायिक आहे. कनिकाचं हे दुसरं लग्न आहे. वयाच्या 18व्या वर्षी तिने पहिलं लग्न केलं. लग्नानंतर ती लंडनला राहायला गेली. काही वर्षांनंतर तिने पतीला घटस्फोट दिला. कनिकाला पहिल्या पतीपासून तीन मुलं आहेत.

आयना, समारा आणि युवराज अशी तिच्या मुलांची नावं आहेत. कनिका मूळची लखनऊची असून आईवडिलांना भेटण्यासाठी ती अनेकदा भारतात येते. बॉलिवूडमधील अनेक गाजलेली गाणी तिने गायली आहेत. 2012 मध्ये 'जुगनी जी' या गाण्यामुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर 2014 मध्ये 'बेबी डॉल' हे तिचं गाणं खूप गाजलं.