
Aaishvary Thackeray : दिग्दर्शक अनुराग कश्यपचा आगामी ‘निशांची’ हा क्राईम ड्रामा असलेला चित्रपट चर्चेत आला आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’सारख्या चित्रपटांसाठी अनुराग ओळखला जातो. ‘निशांची’सुद्धा याच पठडीतला असल्याचं दिसून येत आहे. परंतु हा चित्रपट त्यातील मुख्य अभिनेत्यामुळे चर्चेत आला आहे. अनुराग कश्यपच्या ‘निशांची’मधून ठाकरे कुटुंबातील ऐश्वर्य ठाकरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अनुराग अनेकदा त्याच्या चित्रपटांमध्ये नवोदित कलाकारांना संधी देण्याला प्राधान्य देतो. याला ‘निशांची’सुद्धा अपवाद ठरला नाही. ऐश्वर्य हा बाळासाहेब ठाकरे यांचा नातू असून स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांचा मुलगा आहे. या चित्रपटासाठी ऐश्वर्यचीच निवड का केली, या प्रश्नाचं उत्तर अनुरागने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलं आहे.
“मी भूमिकेसाठी योग्य अभिनेता शोधतो आणि त्याला तयारीसाठी पुरेसा वेळ देतो. मी त्यात ती क्षमता पाहिली होती, कारण त्याने ‘शूल’मधील मनोज वाजपेयीचा मोनोलॉग म्हणून दाखवला होता. तो ठाकरे आहे किंवा महाराष्ट्रीयन आहे हे मला माहीतसुद्धा नव्हतं. जेव्हा मी त्याला भेटलो, तेव्हा त्याने मला त्याच्याबद्दल सांगितलं होतं. त्याला संगीतात अधिक रस होता आणि त्याचवेळी तो अभिनयाचे वर्कशॉप्सही करत होता. मी त्याला स्क्रीप्ट देताच त्याच्याच उत्सुकता निर्माण झाली”, असं अनुराग म्हणाला.
‘निशांची’मधील भूमिकेसाठी तुला खूप तयारी करावी लागेल आणि ‘कानपुरीया’ बनावं लागेल, असं अनुरागने ऐश्वर्याला सांगितलं होतं. त्यावर ऐश्वर्यने चार वर्षे मेहनत घेतली. “त्याने भूमिकेवर प्रचंड काम केलंय. त्याच्या आयुष्यातील चार वर्षे त्याने या चित्रपटासाठी आणि माझ्यासाठी दिली आहेत. फक्त अट एवढीच होती की त्याने दुसरं काहीच करू नये”, असं अनुरागने स्पष्ट केलं. ऐश्वर्य या अटीवर कायम राहिला आणि त्याने दुसरा कोणताच चित्रपट साइन केला नाही.
‘निशांची’ या चित्रपटात ऐश्वर्यसोबतच वेदिका पिंटो, मोनिका पन्वर, मोहम्मद झीशान अयुब आणि कुमुद मिश्रा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 19 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.