सोनूच्या प्रेमात वेडा होता टप्पू? अफेअरच्या चर्चांवर अखेर सोडलं मौन
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत टप्पू आणि सोनूची भूमिका साकारणारे अभिनेते भव्य गांधी आणि निधी भानुशाली एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांवर अखेर भव्य गांधीने मौन सोडलं आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेनं जवळपास 15-16 वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जेठालाल, दयाबेन, टप्पू, सोनू, हाथी.. अशी पात्रं घराघरात लोकप्रिय ठरली आहेत. ही पात्रं साकारणाऱ्या कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. एकेकाळी यामध्ये टप्पूची भूमिका साकारलेला अभिनेता भव्य गांधी आणि सोनू भिडेची भूमिका साकारलेली निधी भानुशाली यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. या चर्चांवर बऱ्याच वर्षांनंतर आता भव्यने मौन सोडलं आहे.
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत भव्य म्हणाला, “मी आजसुद्धा टप्पू सेनेच्या संपर्कात आहे. आम्ही सर्वजण एकमेकांच्या संपर्कात असतो. सर्वजण आपापल्या आयुष्यात चांगलं काहीतरी करत आहेत. निधीसोबतच्या अफेअरच्या चर्चांबद्दल बोलायचं झालं तर ती सोनू आणि टप्पू यांच्यातली ऑनस्क्रीन गोष्ट होती. लोकांनी त्याला निधी आणि भव्य यांच्या अफेअरचं नाव दिलं. ज्याप्रकारे मी, कुश, अजहर आणि समय एकमेकांचे मित्र आहोत, त्याचप्रकारे निधीसुद्धा आमची मैत्रीण आहे. आम्ही सर्वजण एकाच ग्रुपमध्ये होतो. आम्ही एकत्र फिरायला जायचो.”
View this post on Instagram
“आम्ही एकमेकांशी गप्पा-गोष्टी करायचो. शूटिंगमधून थोडा वेळ मिळाला की आम्ही सहज फिरायला जायचो. तेव्हा कोणीतरी आम्हाला एकत्र पाहिलं आणि त्यातून काय विचार केला काय माहीत? परंतु आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. आम्ही आमच्या भूमिकांमध्ये फिट होतो. मालिकेतही आम्हा पाच जणांमध्ये चांगली मैत्री होती, तशीच मैत्री आमची खऱ्या आयुष्यातही झाली होती”, असं भव्यने स्पष्ट केलं.
निधीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 2019 मध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने ही लोकप्रिय मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. निधीने या मालिकेत ‘गोकुलधाम’ सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी भिडे मास्तर यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. तिचं स्वत:चं युट्यूब चॅनलसुद्धा आहे. त्यावर ती तिच्या ट्रिप्सचे बरेच फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. तर भव्यनेही ‘तारक मेहता..’ सोडल्यानंतर इतर काही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
एका मुलाखतीत निधीने मालिका सोडण्याचं खरं कारण सांगितलं होतं. कामाच्या ताणामुळे सेटवर अनेकदा तिचं इमोशनल ब्रेकडाऊन (भावनिकदृष्ट्या खचणं) व्हायचं. याच कारणामुळे तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता.
