
हॉरर थ्रिलर हा असा एक जॉनर आहे, जो अनेक सिनेप्रेमींची पहिली पसंत ठरलाय. परंतु अनेक हॉरर चित्रपट आणि वेब सीरिज असेही आहेत ज्यांना एकट्याने पाहणं म्हणजे एक मोठा टास्कच मानला जातो. अशीच एक आठ एपिसोड्सची वेब सीरिज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे. या सीरिजच्या सर्व एपिसोड्समध्ये तुम्हाला भूत चेटकिण यांचा भरणा आहे. इतकंच नव्हे तर या सीरिजची कथा इतकी भयानक आहे की तुम्ही एकट्याने ती पाहूच शकणार नाहीत. ही सीरिज नेमकी कोणती आहे ते जाणून घेऊयात..
ज्या हॉरर थ्रिलर वेब सीरिजबद्दल आम्ही बोलतोय, त्याच्या रिलीजला दहा दिवसांहून अधिक काळ झाला आहे, परंतु अजूनही ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिला गेलेल्या सीरिजमध्ये ट्रेंड होत आहे. ही सीरिज इतकी भयानक आहे की ती पाहण्यासाठी तुम्हाला कदाचित हनुमान चालीसाची गरज पडू शकेल. या सीरिजमध्ये एक तरुण मुलगा आहे, ज्याला प्रेतात्मा दिसतात. त्याला सुरुवातीला त्याच्या या अनुभवावर विश्वासच बसत नाही. परंतु विमानात जेव्हा त्याच्यासोबत एक घटना घडते तेव्हा प्रत्येक गोष्टीवर पुनर्विचार करण्याची त्याच्यावर वेळ येते. त्यानंतर पायलटची नोकरी सोडून तो दुसऱ्या विश्वातील लोकांसोबत म्हणजेच भूतांसोबत संपर्क साधू लागतो. जेणेकरून भटकणाऱ्या आत्मांना शांती मिळू शकेल. परंतु त्याचा हा निर्णयच त्याच्या जीवावर बेततो आणि अखेर त्याचा मृत्यू होतो.
या सीरिजचं नाव ‘भय’ असून त्यामध्ये अभिनेता करण ठक्करची मुख्य भूमिका आहे. सत्य घटनांपासून प्रेरित असलेली ‘भय: द गौरव तिवारी मिस्ट्री’ ही सीरिज 12 डिसेंबर रोजी ॲमेझॉन एमएक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. तेव्हापासून ही सीरिज ओटीटीवर ‘मस्ट वॉच’ बनली आहे. या सीरिजची कथा इतकी दमदार आहे आणि त्यातील कलाकारांचा अभिनय इतका जबरदस्त आहे की आयएमडीबीवर या सीरिजला दहापैकी 8.4 अशी धमाकेदार रेटिंग मिळाली आहे. जर तुम्हाला हॉरर थ्रिलर वेब सीरिज पाहायची आवड असेल तर ही सीरिज तुम्ही नक्कीच तुमच्या वॉच लिस्टमध्ये समाविष्ट करू शकता.