Bigg Boss 17 : पतीबद्दल अखेर अंकिता स्पष्टच बोलली, “आज तो माझ्यामुळेच इथे..”

बिग बॉसचा सतरावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. या सिझनमध्ये पहिल्या एपिसोडपासून अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन चर्चेत आहेत. आता नव्या एपिसोडमध्ये अंकिता विकीबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसते. ईशा मालवीयसोबत बोलताना अंकिता तिच्या मनातील खदखद व्यक्त करते

Bigg Boss 17 : पतीबद्दल अखेर अंकिता स्पष्टच बोलली, आज तो माझ्यामुळेच इथे..
Vicky Jain and Ankita Lokhande
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 18, 2023 | 9:11 AM

मुंबई : 18 ऑक्टोबर 2023 | अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘बिग बॉस 17’मध्ये सहभागी झाल्यापासून सतत चर्चेत आहे. पती विकी जैनसोबत ती बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. मात्र अगदी पहिल्या दिवसापासून या दोघांची जोडी काही ना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये अंकिता तिच्या पतीवर चांगलीच नाराज झाल्याचं दिसून आलं. याआधीच्या एपिसोडमध्ये एकदा अंकिता विकीवर चप्पर भिरकावताना दिसली. तर एकदा ती त्याच्या प्रँकवर भडकली होती. आता विकी घरातील इतर स्पर्धकांसोबत अधिक व्यस्त झाल्याने अंकिता त्याच्यावर नाराज झाली आहे.

या एपिसोडमध्ये अंकिता ही ईशा मालवियसोबत बोलताना दिसतेय. पती विकी जैन हा इतर स्पर्धकांसोबतच जास्त व्यस्त असतो, असं ती ईशाला सांगत असते. “विकीची ही सवयच आहे. जेव्हा तो नवीन लोकांना भेटतो, तेव्हा जवळच्या व्यक्तींना तो विसरतो. तो तसाच आहे आणि त्याला फक्त स्वत:विषयी सांगायचं असतं. नवीन लोकांना भेटल्यावर त्याचा स्वभाव कसा असतो माहितीये का? त्याला असं वाटतं की आज इतके लोक माझ्या बाजूने उभे आहेत”, असं अंकिता ईशाला बोलून दाखवत असते.

पुढे अंकिता असंही बोलून दाखवते की तिला घरी जायचं आहे. “मला माझ्या घरी जायचं आहे. पती विकी जैनलाच बिग बॉसमध्ये खेळू द्या. कारण तो सर्वांत चांगला स्पर्धक आहे. मी जवळच्या लोकांची साथ कधीच सोडत नाही. मी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाते. जर विकी आज इथे आहे ना, तेसुद्धा माझ्यामुळेच आहे. कारण त्याला मी इथे आणलंय. विकीला मी एकटं असल्याचं कधीच जाणवू दिलं नाही”, असं ती पुढे म्हणते.

15 ऑक्टोबर रोजी बिग बॉसच्या घरात 17 स्पर्धकांची एण्ट्री झाली. या स्पर्धकांना घरात एकत्र राहून 24 ताससुद्धा झाले नव्हते आणि त्यांच्यात भांडणं सुरू झाली. सर्वांत आधी प्रेक्षकांना इशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांच्यातील कडाक्याचं भांडण पहायला मिळालं. त्यानंतर पती विकी जैनच्या एका वक्तव्यावरून अंकिता लोखंडेनं थेट त्याला चप्पल फेकून मारली. या एपिसोडचा प्रोमो चांगलाच व्हायरल झाला होता.