Bigg Boss 18: ट्रॉफी न जिंकल्याने सर्वांसमोर विवियनवर भडकली पत्नी? व्हिडीओ व्हायरल

बिग बॉसच्या अठराव्या सिझनची रविवारी सांगता झाली. अभिनेता करणवीर मेहराने विजेतेपद पटकावलं, तर विवियन डिसेना दुसऱ्या स्थानी राहिला. यानंतर त्याच्या पत्नीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती सर्वांसमोर विवियनवर चिडलेली दिसून येत आहे.

Bigg Boss 18: ट्रॉफी न जिंकल्याने सर्वांसमोर विवियनवर भडकली पत्नी? व्हिडीओ व्हायरल
विवियन डिसेना, नौरान ॲली
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 20, 2025 | 11:40 AM

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’च्या अठराव्या सिझनची रविवारी सांगता झाली. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करणवीर मेहरा या सिझनचा विजेता ठरला. करणवीरला 50 लाख रुपये बक्षीस आणि बिग बॉसची ट्रॉफी मिळाली. तर अभिनेता विवियन डिसेनाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. करणवीर आणि विवियनसोबतच रजत दलाल, अविनाश मिश्रा, चुम दरांग आणि ईशा सिंह हे चार स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले होते. अंतिम चुरस करणवीर आणि विवियन यांच्यात रंगली होती. या दोघांना त्यांच्या चाहत्यांकडून तगडा पाठिंबा होता. जितकी लोकप्रियता करणवीरची होती, तितकीच विवियनचीही होती. त्यामुळे सलमानने जेव्हा विजेता म्हणून करणवीरची घोषणा केली, तेव्हा विवियन आणि त्याचे चाहते खूप निराश झाले. या फिनालेनंतर आता सोशल मीडियावर विवियन आणि त्याची पत्नी नौरान ॲलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पापाराझींनी सोशल मीडियावर विवियन आणि नौरानचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये दोघं सेटबाहेर येताना दिसत आहेत. मात्र यावेळी नौरान विवियनवर भडकल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि हातवारे पाहून ती सर्वांसमोर विवियनवर चिडल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. तर यावेळी विवियन मात्र शांतपणे तिचं ऐकत होता. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

विवियन डिसेना बिग बॉसच्या घरात असताना त्याला पाठिंबा देण्यासाठी नौरान दोन वेळा तिथे गेली होती. पहिल्यांदा जेव्हा ती बिग बॉसच्या घरात गेली, तेव्हा तिने कन्फेशन रुममध्ये विवियनला काही स्पर्धकांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, अविनाश मिश्रा आणि ईशा सिंह यांच्यापासून चार हात लांब राहण्याचं तिने सांगितलं होतं. मात्र तरीसुद्धा विवियन अविनाश आणि ईशासोबत राहिला आणि त्याने करण आणि शिल्पा यांना नॉमिनेट केलं. त्यानंतर फॅमिली वीकदरम्यान नौरान पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात गेली आणि विवियनसोबत ती एक दिवस राहिली. यावेळी त्यांच्या मुलीनेही काही क्षणांसाठी तिथे हजेरी लावली होती. ‘बिग बॉस 18’ हा सिझन सुरू झाल्यापासून विवियन सर्वांत ताकदीचा स्पर्धक असल्याचं मानलं गेलं होतं.