
टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या एकोणिसाव्या सिझनची सांगता आज (7 डिसेंबर 2025) होणार आहे. यंदाच्या सिझनचं विजेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉसचा हा सिझन मागील 18 सिझन्सपेक्षा खूप वेगळा ठरला. या संपूर्ण सिझनदरम्यान असे काही ट्विस्ट अँड टर्न्स पहायला मिळाले, जे याआधी कधीच घडले नव्हते. स्पर्धकांच्या गेम प्लॅनपासून ते निर्मात्यांच्या नवीन रणनीतींपर्यंत.. या सिझनने प्रत्येक आठवड्याला प्रेक्षकांना सरप्राइज दिले. काही टास्क, निर्णय आणि सरप्राइज पहिल्यांदाच पहायला मिळाले. आज आम्ही तुम्हाला पाच अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे हा सिझन इतर सिझन्सपेक्षा हटके ठरला.
यंदाच्या सिझनची खास गोष्ट म्हणजे यावेळी बिग बॉसच्या घरात कोणतंच रोमँटिक कपल बनलं नाही. गेल्या अनेक सिझनमध्ये नेहमीच कोणती ना कोणती लव्हस्टोरी पहायला मिळत होती. प्रिन्स नरुला-युविका चौधरी, सारा खान-अली मर्चंट, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्रा यांसारख्या जोड्या बिग बॉसमुळे प्रकाशझोतात आल्या. परंतु यावेळी स्पर्धकांनी त्यांच्या खेळीवर आणि योजनेवर अधिक लक्ष केंद्रीत केलं. त्यामुळे रोमान्सचा तडका यंदा कमी होता.
बिग बॉस 19 मध्ये यंदा कॅप्टनलाही ड्युटी करावी लागत होती. शाहबाज, बादशाह, मृदुल तिवारी आणि गौरव खन्ना यांसारख्या स्पर्धकांनी कॅप्टन बनल्यानंतरही घरातील इतर जबाबदाऱ्या पार पाडल्या. आधीच्या सिझन्समध्ये कॅप्टन कोणतीच कामं करत नव्हता.
बिग बॉस 12, 15 आणि 16 सिझन्सच्या स्पर्धकांना घरातील नियम मोडल्यानंतर शिक्षा म्हणून तुरुंगात बसावं लागत होतं. परंतु यंदाच्या सिझनमध्ये असं काहीच झालं नाही. कोणालाच तुरुंगात जावं लागलं नाही किंवा कोणालाच शिक्षाही झाली नाही.
बिग बॉस 19 मध्ये सर्वांत आश्चर्यकारक घटना पहिल्याच दिवशी घडली. स्पर्धकांनी फरहाना भट्टला बेघर करण्यासाठी नॉमिनेट केलं. परंतु तिला पूर्णपणे घरातून काढण्याऐवजी निर्मात्यांनी तिला सीक्रेट रुममध्ये पाठवलं होतं. याआधीच्या सिझनमध्ये असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे या सिझनच्या सुरुवातीलाच ड्रामा आणि वाद पहायला मिळाला होता.
बिग बॉस 19 मध्ये कोणतीच डिनर डेट झाली नाही. आधीच्या सिझनमध्ये नेहमीच स्पर्धक आणि त्यांच्या पार्टनरसोबत रोमँटिक डिनर डेट पहायला मिळत होती. उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना हेसुद्धा रोमँटिक डिनर डेटचा आनंद घेताना दिसले होते. बनी जे आणि गौरव चोप्रा यांनासुद्धा एका टास्कदरम्यान स्पेशल डिनर डेटची संधी मिळाली होती. रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्लासुद्धा डिनर डेटवर गेले होते. परंतु या सिझनमध्ये असं काहीच घडताना दिसलं नाही.