Bigg Boss 19 फिनालेमध्ये पाय ठेवलास तर..; प्रसिद्ध अभिनेत्याला धमकी, नेमकं प्रकरण काय?
बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले सुरू होण्यासाठी काही तास शिल्लक असताना एका प्रसिद्ध अभिनेत्याला धमकी देण्यात आली आहे. सलमान खानसोबत स्टेज शेअर केलास तर आयुष्यात काम करू शकणार नाहीस, अशी धमकी अभिनेत्याला देण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्यात सुरू झालेला ‘बिग बॉस’चा एकोणिसावा सिझन अखेर आज (7 डिसेंबर) प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. रात्री 9 वाजल्यापासून जिओ प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा ग्रँड फिनाले स्ट्रीम होणार आहे. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये इतर बरेच सेलिब्रिटीही सहभागी होणार आहेत. काहीजण स्टेजवर परफॉर्म करणार आहेत, तर काही जण त्यांच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी फिनालेमध्ये उपस्थित राहणार आहेत. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्याला फिनालेमध्ये जाण्याच्या काही तास आधी कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई गँगकडून धमकी मिळाली आहे. ही धमकी फोन कॉलद्वारे देण्यात आली आहे.
फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीने बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचं म्हटलंय. जर बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानसोबत स्टेजवर उपस्थित राहिलास, तर आयुष्यात तू कधी काम करू शकणार नाहीस, अशी धमकी देण्यात आली आहे. इतकंच नव्बे तर अभिनेत्याकडे मोठ्या रकमेची मागणीही करण्यात आली आहे. ज्या अभिनेत्याला ही धमकी मिळाली, तो दुसरा तिसरा कोणी नसून भोजपुरी स्टार पवन सिंह आहे. या घटनेनंतर पवन सिंहने लगेच सुरक्षा यंत्रणांना याबद्दलची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी मोबाइल नंबर आणि कॉल डिटेल्सच्या आधारे ताबडतोब तपास सुरू केला आहे. पवन सिंहला अत्यंत वाईट परिणामांना सामोरं जावं लागणार, अशी धमकी बिष्णोई गँगकडून देण्यात आली आहे.
View this post on Instagram
लॉरेन्स बिष्णोई गँग आणि सलमान खानचा वाद
लॉरेन्स बिष्णोई आणि सलमान खानचा हा वाद फार जुना आहे. 1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानने जोधपूरमध्ये काळविटीची शिकार केल्याचा आरोप होता. काळवीट हे बिष्णोई समाजात अत्यंत पवित्र पशु मानलं जातं. त्यामुळे काळवीट शिकार हे त्यांच्यासाठी फार मोठं पाप आहे. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याच समुदायाचा असल्याने त्याने याचा सूड घेण्यासाठी अनेकदा सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. इतकंच नव्हे तर सलमानशी जो कोणी जवळीक साधेल, त्यालाही वाईट परिणामांना सामोरं जावं लागणार, अशा धमका त्याच्या गँगकडून वारंवार देण्यात आल्या आहेत.
