
‘बिग बॉस 19’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा 14 आठवड्यांचा प्रवास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या शोच्या ग्रँड फिनालेसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात टॉप 6 स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. प्रत्येक स्पर्धकाची नजर ट्रॉफीवर टिकून आहे. विजेतेपद जिंकण्यासाठी स्पर्धकांकडून कठोर मेहनत केली जातेय. सहा स्पर्धकांपैकी ट्रॉफी कोण पटकावणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्येही आहे. ‘बिग बॉस 19’च्या नव्या प्रोमोमध्ये सूत्रसंचालक सलमान खानने ग्रँड फिनालेची तारीख जाहीर केली आहे. सिझन 19 चा फिनाले रविवारी येत्या 7 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. “7 डिसेंबरची रात्र सर्वांत ग्रँड असेल, कारण बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. विजेत्याचा किताब कोण पटकावणार आणि कोणाचा प्रवास संपुष्टात येणार? हे सर्व समोर येईल”, असं तो या प्रोमोमध्ये सांगतो.
सलमान खानने दिलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस 19’चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. याशिवाय कलर्स टीव्हीवरही प्रेक्षक फिनालेचा एपिसोड पाहू शकतील. हा एपिसोड रात्री 10.30 वाजता प्रसारित होणार आहे. ज्यांच्याकडे जियो हॉटस्टारचं सबस्क्रीप्शन नाही, ते कलर्स टीव्हीवर फिनाले पाहू शकतील.
बिग बॉसच्या घरात सध्या सहा स्पर्धक आहे. यामध्ये गौरव खन्ना, फरहाना भट्ट, मालती चाहर, अमाल मलिक, तान्या मित्तल आणि प्रणित मोरे यांचा समावेश आहे. दरम्यान फिनालेच्या आधी मिड वीक एविक्शन होण्याचीही जोरदार चर्चा आहे. तसं झाल्यास फक्त 5 स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचू शकतील.
‘बिग बॉस 19’विषयी प्रत्येक अपडेट देणाऱ्या ‘बिग बॉस तक’ या पेजने चौदाव्या आठवड्याची पॉप्युलॅरिटी म्हणजेच लोकप्रियतेची रँकिंग जाहीर केली आहे. या यादीत काही नवे स्पर्धक टॉप 5 मध्ये पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी गौरव पहिल्या क्रमाकांवर होता. आता नव्या यादीनुसार गौरवची पहिली जागा फरहाना भट्टने घेतली आहे. त्यामुळे गौरव दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तिसऱ्या क्रमांकावर प्रणित मोरे, चौथ्यावर संगीतकार अमाल मलिक, पाचव्यावर तान्या मित्तल आहे. तर वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतलेली मालती चाहर या रँकिंगमधून बाहेर पडली आहे.