क्रिकेटरच्या बहिणीला लाथ मारण्याविषयी अखेर प्रणित मोरेनं सोडलं मौन; म्हणाला..

बिग बॉसच्या घरात प्रणित मोरे आणि मालती चाहर यांच्यात चांगली मैत्री झाली होती. परंतु प्रणितच्या एका मस्करीमुळे या मैत्रीत फूड पडली. त्यामुळे नाराज झालेली मालती त्याच्याशी न बोलताच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली होती. त्यावर अखेर प्रणितने मौन सोडलं आहे.

क्रिकेटरच्या बहिणीला लाथ मारण्याविषयी अखेर प्रणित मोरेनं सोडलं मौन; म्हणाला..
Pranit More and Malti Chahar
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 08, 2025 | 6:56 PM

जवळपास तीन महिन्यांनंतर ‘बिग बॉस 19’मधील स्पर्धकांचा प्रवास संपुष्टात आला. ग्रँड फिनालेच्या अगदी जवळ येऊन क्रिकेटर दीपक चाहरची बहीण मालती चाहर घराबाहेर पडली. तर स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेसुद्धा टॉप 3 पर्यंतच पोहोचू शकला. बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. दोघांनी शोच्या शेवटपर्यंत एकमेकांची साथ दिली होती. परंतु प्रणितच्या एका मस्करीमुळे मालती आणि त्याच्या मैत्रीत फूट पडली. ज्यादिवशी मालती बिग बॉसच्या घराबाहेर पडली, त्याच दिवशी प्रणितने मस्करीत तिला लाथ मारली होती. यामुळे मालती त्याच्यावर इतकी नाराज झाली की प्रणितशी एकही शब्द न बोलता ती घराबाहेर निघून गेली. त्यानंतर प्रणितला त्याची चूक उमगली आणि तो रडू लागला. अखेर ग्रँड फिनालेच्या एपिसोडमध्ये दोघांनी समजूतदारपणा दाखवत वाद मिटवला.

शो संपल्यानंतर आता प्रणित मोरेनं मालतीसोबत झालेल्या या वादाविषयी अखेर मौन सोडलं आहे. ‘विरलभयानी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रणित म्हणाला, “होय, मस्करीत थोडी मर्यादा ओलांडली गेली. परंतु माझा हेतू तसा नव्हता. मी मस्करीतच तिच्याशी वागत होतो आणि विचार करत होतो की तिला बाजूला करण्यासाठी अॅक्शन करून. परंतु माझी लाथ तिला चुकून लागली. मी माझ्या मित्र किंवा मैत्रिणीला लाथ कशाला मारेन? परंतु कॅमेऱ्यावर ते तसं दाखवलं गेलं. नंतर मी मालतीची माफीसुद्धा मागितली.”

मालतीसोबतच्या नात्याविषयी प्रणित पुढे म्हणाला, “आमच्यात फक्त चांगली मैत्री आहे. आमच्यात रोमँटिक असं काहीच नव्हतं. इन्स्टा रील्सवर हे सगळं कसं आलं माहीत नाही आणि नंतर ते बिग बॉसच्या प्रवासाच्या व्हिडीओमध्येही दाखवलं गेलं. अजूनही मी तिला मैत्रीणच मानतो. तिला माझ्या वागणुकीचं वाईट वाटलं होतं, परंतु मला तो वाद मिटवायचा होता. तितक्यात ती स्पर्धेतून बाद झाली. त्यामुळे मला तिच्याशी बोलण्याची संधीच मिळाली नाही. आता घराबाहेर आलोय तर तिची मनधरणी नक्कीच करेन. तीसुद्धा माझं ऐकून घेईल, असं मला वाटतं.”