
ऑगस्ट महिन्यात सुरू झालेला ‘बिग बॉस’चा एकोणिसावा सिझन अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. येत्या 7 डिसेंबर रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार असून विजेत्याचं नाव घोषित होणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात पाच स्पर्धक आहेत. या पाच जणांमध्ये बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरस रंगली आहे. हे पाचही स्पर्धक जवळपास 14 आठवड्यांपासून बिग बॉसच्या घरात आहेत. या 14 आठवड्यांसाठी त्यांना चांगलं मानधनसुद्धा मिळालं आहे. शिवाय विजेत्याला तब्बल 50 लाख रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहे. टॉप 5 स्पर्धकांमध्ये अमाल मलिक, फरहाना भट्ट, प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि ‘तिकिट टू फिनाले’चा विजेता गौरव खन्ना यांचा समावेश आहे. बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी स्पर्धकांना ठराविक मानधन मिळतं. स्पर्धकाच्या लोकप्रियतेनुसार मानधनाचा हा आकडा वेगवेगळा असतो.
बिग बॉसच्या घरात चौदा आठवडे टिकणं ही काही सहजसोपी गोष्ट नाही. त्यासाठी या स्पर्धकांना शोचे कठोर नियम, नियमांना धरून बनवलेला फॉरमॅट या सर्वांचं काटेकोरपणे पालन करावं लागलं आहे. त्याचसोबत आपल्या खेळीने प्रेक्षकांची मनं कशी जिंकता येतील, याचंही भान त्यांना ठेवावं लागलं आहे. ‘बिग बॉस 19’साठी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्नाला सर्वाधिक मानधन मिळाल्याचं कळतंय. जीके म्हणून ओळखला जाणारा गौरव हा चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे ट्रॉफीचा तो प्रबळ दावेदार मानला जात आहे. गौरवला प्रत्येक आठवड्यासाठी जवळपास 17.5 लाख रुपये मानधन मिळत आहे. म्हणजेच चौदा आठवड्यांमध्ये त्याने तब्बल 2.45 कोटी रुपये कमावले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, गौरवची एकूण संपत्ती 15 ते 18 कोटी रुपये इतकी आहे.
गौरव खन्नानंतर प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अमाल मलिकला सर्वाधिक मानधन मिळालं आहे. अमालला प्रत्येक आठवड्यासाठी 8.75 लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे चौदा आठवड्यांमध्ये त्याने एकूण 1.225 कोटी रुपये कमावले आहेत. अमाल मलिकची एकूण संपत्ती 25 ते 30 कोटी रुपये आहे. तिसऱ्या क्रमांकावर ग्वालियारची उद्योजिका आणि अध्यात्मिक इन्फ्लुएन्सर तान्या मित्तल आहे. तान्याला प्रत्येक आठवड्यासाठी 3 ते 6 लाख रुपये मानधन मिळतंय. चौदा आठवड्यांमध्ये तिने 42 ते 84 लाख रुपये कमावले आहेत. तान्याची एकूण संपत्ती ही गौरव आणि अमाल यांच्यापेक्षा बरीच कमी आहे. ती 12 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.
फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे हे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. फरहानाला दर आठवड्यासाठी दोन ते चार लाख रुपये मिळाले. त्यानुसार चौदा आठवड्यांमध्ये तिने 28 ते 56 लाख रुपये कमावले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, फरहानाची एकूण संपत्ती ही शोमध्ये सहभागी झालेल्या सर्व 18 स्पर्धकांपेक्षा कमी आहे. ‘फिल्मीबीट’ने दिलेल्या माहितीनुसार, फरहानाची संपत्ती दीड ते तीन कोटी रुपयांदरम्यान आहे. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला सर्वांत कमी मानधन मिळालं आहे. त्याला एका आठवड्यासाठी एक ते दोन लाख रुपये मिळत असून त्याची चौदा आठवड्यांची कमाई 14 ते 28 लाख रुपयांदरम्यान आहे. तर प्रणितची एकूण संपत्ती 4 ते 8 कोटी रुपयांदरम्यान आहे.
‘बिग बॉस 19’चा ग्रँड फिनाले रविवारी 7 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार आहे. फिनालेचं लाइव्ह स्ट्रिमिंग जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रात्री 9 वाजल्यापासून पाहता येईल. तर कलर्स टीव्हीवर हा फिनाले रात्री 10.30 वाजल्यापासून प्रसारित होणार आहे. 24 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेल्या या सिझनचं सूत्रसंचालन सलमान खान करत आहे. या फिनालेमध्ये नेहल चुडासमा, नीलम गिरी यांचे डान्स परफॉर्मन्सेस पहायला मिळणार आहेत. याशिवाय इतर काही सेलिब्रिटींचेही परफॉर्मन्सेस पार पडणार आहेत.
‘तू बॅकफूटवर खेळतोय..’ हे वाक्य गौरव खन्नाने ‘बिग बॉस 19’च्या सुरुवातीपासून अनेकदा ऐकलं आहे. लिव्हिंग रुममध्ये बसून आरडाओरड करणं, प्रत्येक भांडणात पाऊल ठेवणं किंवा प्रत्येक ठिकाणी आपला वरचष्मा दाखवणं.. यापैकी गौरवने काहीच केलं नाही. याउलट तो शांतपणे, निरीक्षण करत आपला खेळ खेळत राहिला. जेव्हा गरज असेल तेव्हाच त्याने आपली मतं मांडली. पण बिग बॉसच्या घरात त्याची हीच बाजू कमकुवत मानली गेली. पण याच कारणामुळे प्रेक्षकांनी त्याला पाठिंबा दिला आणि तिकिट टू फिनाले जिंकवून दिलं.
गौरव खन्ना
बिग बॉस म्हटलं की ड्रामा, भांडणं आणि आरडाओरड हे सर्व आलंच. या शोची ओळखच तशी असल्याने गौरवच्या शांत खेळीची खिल्ली उडवण्यात आली. पण जसजसा खेळ पुढे गेला, तसतसा गौरव बिग बॉसच्या घरातील स्ट्राँग स्पर्धक ठरला. फिनालेमध्ये आपली जागा निश्चित करणारा तो पहिला स्पर्धक ठरला.
काश्मीरच्या फरहाना भट्टचा प्रवास या सिझनमधला सर्वांत लक्षवेधी ठरला. अत्यंत महत्त्वाकांक्षी, संयमी आणि स्वत:वर पूर्णपणे विश्वास असलेली स्पर्धक.. अशी तिची ओळख निर्माण झाली. जसजसा हा सिझन पुढे सरकत गेला, तसतशी तिची लोकप्रियता वाढत गेली. बिग बॉसच्या घरात संगीतकार-गायक अमाल मलिकसोबतची तिची मैत्री सर्वांत नाट्यमय ठरली. एकमेकांवर टीका-टिप्पणींपासून सुरू झालेला हा प्रवास अखेर त्याच्याकडून संगीत शिकण्याच्या अनपेक्षित वळणावर येऊन पोहोचला. तर प्रणित मोरेसोबत तिची मैत्री अत्यंत चांगल्या प्रकारे खुलली. बिग बॉसच्या घरात या दोघांचं नातं अधिक दृढ बनत गेलं. तान्या मित्तलसोबत फरहानाचं नातं पूर्णपणे वेगळं होतं. दोघींमध्ये अनेकदा भांडणं झाली असली तरी नेहमीच त्या एकमेकींच्या ताकदी मान्य करत असत.
फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे
फरहानाच्या या प्रवासात मोठं वळण तेव्हा आलं, जेव्हा दुसऱ्या स्पर्धकाशी संबंधित एका टॅलेंट मॅनेजरने तिच्या काश्मिरी पार्श्वभूमीवरून अपमानास्पद टिप्पणी केली. एका ऑनलाइन टॉक शोदरम्यान संबंधित मॅनेजरने फरहानावर टीका केली. परंतु याचा उलट परिणाम त्याच्यावरच झाला. नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करत फरहानाला पाठिंबा दर्शवला. हळूहळू तिला प्रेक्षकांकडून सहानुभूती मिळू लागली आणि याचाच तिला मोठा फायदा झाला. त्यामुळे बिग बॉस या शोचा प्रचंड सकारात्मक परिणाम फरहानाच्या एकूण इमेज-बिल्डिंगवर पडला, असं म्हणायला हरकत नाही.
गौरव खन्ना, फरहाना भट्ट, अमाल मलिक, प्रणित मोरे आणि तान्या मित्तल या पाच स्पर्धकांपैकी कोण विजेतेपद आपल्या नावे करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.