Bigg Boss 19 : अरिजीत सिंहसोबतच्या वादावर अखेर सलमानने सोडलं मौन; स्पष्टच म्हणाला..

जवळपास गेल्या दहा वर्षांपासून अभिनेता सलमान खान आणि गायक अरिजीत सिंह यांच्यात वाद सुरू आहे. अरिजीतने सलमानची जाहीर माफीसुद्धा मागितली होती. त्यानंतर आता बिग बॉसमध्ये सलमानने त्यावर मौन सोडलं आहे.

Bigg Boss 19 : अरिजीत सिंहसोबतच्या वादावर अखेर सलमानने सोडलं मौन; स्पष्टच म्हणाला..
Salman Khan and Arijit Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 13, 2025 | 8:10 AM

‘बिग बॉस 19’च्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सूत्रसंचालक सलमान खानने गायक अरिजीत सिंहसोबतच्या वादावर मौन सोडलं आहे. यावेळी त्याने कबूल केलं की या वादात सलमानचा गैरसमज झाला होता. तर दुसरीकडे ‘बिग बॉस 19’मध्ये या आठवड्यात एक सदस्य नॉमिनेट झाला. ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये जेमी लिव्हर आणि स्टँडअप कॉमेडियन रवी गुप्ता पाहुणे म्हणून पोहोचले होते. या खास एपिसोडमध्ये जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी लिव्हरने फरहान खानची नक्कल करत सर्वांना हसवलं. त्यानंतर तिने घरातील काही स्पर्धकांचीही मिमिक्री केली. तर रवी गुप्ताने सर्व स्पर्धकांवर उपरोधिक टिप्पणी करत लक्ष वेधलं.

काय म्हणाला सलमान?

स्टँडअप कॉमेडियन रवी गुप्ताने सलमानला म्हटलं की, तो बिग बॉसमध्ये येताना प्रचंड घाबरलेला होता, कारण तो गायक अरिजीत सिंहसारखा दिसतो. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अरिजीतचा उल्लेख होताच सलमाननेही त्याच्यासोबतच्या वादावर प्रतिक्रिया दिली. “अरिजीत आणि मी आता चांगले मित्र आहोत. आमच्यात थोडा गैरसमज झाला होता आणि तो गैरसमज माझ्याकडूनच झाला होता”, अशी जाहीर कबुली सलमानने दिली. त्यावर रवी गुप्तानेही वाद मिटल्याचं समाधान व्यक्त केलं. “अरिजीतने त्यानंतर माझ्यासाठी गाणीसुद्धा गायली आहेत. ‘टायगर 3’मध्ये त्याने गाणं गायलं होतं आणि आला ‘गलवान’मध्येही तो गाणार आहे”, असं सलमानने पुढे सांगितलं.

सलमान-अरिजीतमधला वाद

सलमान खान आणि अरिजीत सिंह यांच्यात 2014 मध्ये हा वाद सुरु झाला होता. एका पुरस्कार सोहळ्यात अरिजीतने सलमानला टोमणा मारला होता. त्या पुरस्कार सोहळ्यात सलमान खान आणि रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असतात. ‘तू झोपला होतास का’, असा प्रश्न मंचावर अरिजीतला विचारल्यानंतर त्याने उत्तर दिलं, ‘तुम्ही झोपवलंत’. अरिजीतने अप्रत्यक्षपणे सलमान आणि रितेशच्या सूत्रसंचालनावर टीका केली होती. त्यानंतर सलमानच्या चित्रपटातून अरिजीतची गाणी काढून टाकण्यात आली होती. नंतर अरिजीतने जाहीररित्या सलमानची माफीसुद्धा मागितली होती.

‘बिग बॉस’च्या घरात या आठवड्यात एकूण सहा स्पर्धक नॉमिनेट झाले होते. यामध्ये मृदुल तिवारी, प्रणित तिवारी, बसीर अली, जीशान कादरी, अशनूर कौर आणि नीलम गिरी यांचा समावेश होता. तर एपिसोडच्या सुरुवातीलाच सलमानने स्पष्ट केलं होतं की मृदुल तिवारी आणि प्रणित मोरे यांना इतरांच्या तुलनेत अधिक मतं मिळाल्याने दोघंही सुरक्षित आहेत. तर जीशान कादरी या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला.