
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्नाने ‘बिग बॉस 19’चं विजेतेपद पटकावलं आहे. चाहत्यांप्रमाणेच गौरवच्या आईवडिलांनाही त्यांच्या मुलाच्या या विजयाचं कौतुक आहे. परंतु त्याचसोबत ते बिग बॉसच्या घरातील काही स्पर्धकांवर नाराजसुद्धा आहेत. बिग बॉसच्या घरात गौरवशी भांडताना काही स्पर्धकांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप त्यांनी केला. ‘आयएएनस’ला दिलेल्या मुलाखतीत गौरवचे वडील म्हणाले, “झीशान कादरी आणि अभिषेक बजाज यांसारखे आक्रमक स्पर्धक बिग बॉसच्या घरात होते. त्यांच्यात आणि गौरवमध्ये बरीच भांडणं झाली. परंतु मला माहीत होत की गौरव या परिस्थितीला उत्तमप्रकारे हाताळू शकतो. कारण बिग बॉसच्या घरात तुमची कोणी मदत करू शकत नाही, तुम्हाला स्वत:साठी उभं राहावंच लागतं.”
तुमच्या मुलावर निशाणा साधल्याचं पाहून तुम्हाला कधी राग आला का, असा सवाल त्यांना विचारला असता ते पुढे म्हणाले, “जेव्हा फरहाना भट्टने त्याची खिल्ली उडवली, तेव्हा मला खूप राग आला होता. तिने अत्यंत अपमानास्पद पद्धतीने गौरवला ‘सुपरस्टार’ म्हटलं होतं. टीव्ही अभिनेता म्हणून त्याच्या कामावर आणि करिअरवर तिने प्रश्न उपस्थित केला होता. या गोष्टीमुळे मी खूप नाराज झालो होतो. त्याक्षणी गौरवच्याही चेहऱ्यावरचा राग मला स्पष्ट जाणवत होता. जर मी त्याच्या जागी असतो तर काय झालं असतं मलाच माहीत नाही. मी कदाचित फरहानाच्या कानाखालीही वाजवली असती.”
यावेळी गौरवचे वडील त्यांच्या मुलाच्या प्रवासाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाले. “सुरुवातीला मला हा शो बघून खूप मजा येत होती. घरात बरीच भांडणं होत होती आणि त्यात त्याला का ओढलं जात होतं हेच मला समजत नव्हतं. पण जेव्हा मी त्याला परिस्थितीला हाताळताना आणि इतरांवर विजय मिळवताना पाहिलं, तेव्हा मला समजलं की तो हे सर्व शांत डोक्याने करतोय. भांडणं हा त्याचा स्वभावच नाही. त्यामुळे बिग बॉसच्या घरात त्याला संयमाने वागताना पाहून मला खूप अभिमान वाटत होता”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.
‘बिग बॉस 19’च्या ग्रँड फिनालेमध्ये गौरवने फरहाना भट्ट, प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि अमाल मलिक यांना मात दिली होती. विजेता ठरलेल्या गौरवला बिग बॉसची ट्रॉफी आणि 50 लाख रुपये बक्षीस मिळालं.