टॅक्स कापल्यानंतर ‘बिग बॉस 19’ विजेता गौरव खन्नाच्या हाती लागली फक्त इतकी रक्कम

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्नाने 'बिग बॉस 19'चं विजेतेपद पटकावलं आहे. त्याला 50 लाख रुपये बक्षिस म्हणून मिळाले आहेत. परंतु त्यापैकी टॅक्स कापला जाणार आहे, टॅक्स कापल्यानंतर गौरवच्या हाती किती रुपये शिल्लक राहणार, ते जाणून घ्या..

टॅक्स कापल्यानंतर बिग बॉस 19 विजेता गौरव खन्नाच्या हाती लागली फक्त इतकी रक्कम
Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 08, 2025 | 2:44 PM

ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या ‘बिग बॉस 19’ची सांगता रविवारी 7 डिसेंबर 2025 रोजी झाली. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर ग्रँड फिनालेमध्ये विजेत्याची घोषणा झाली. गौरव खन्ना, फरहाना भट्ट, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल हे पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले होते. तर अंतिम चुरस गौरव आणि फरहाना यांच्यात रंगली होती. अखेरच्या दहा मिनिटांमध्ये गौरवला अधिक मतं मिळाली आणि विजेतेपदावर त्याने आपलं नाव कोरलं. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरवला बिग बॉस 19 ची चमचमणारी ट्रॉफी आणि त्यासोबत बक्षीस म्हणून 50 लाख रुपये मिळाले. परंतु गौरवला पूर्ण 50 लाख रुपये घरी नेता येणार नाहीयेत. कारण त्यातून त्याला टॅक्स भरावा लागणार आहे.

बक्षिसाच्या रकमेतून किती टॅक्स कापला जाणार?

‘बिग बॉस 19’चा विजेता गौरव खन्नाने जरी 50 लाख रुपये जिंकले असले तरी त्याला ती संपूर्ण रक्कम घरी नेता येणार नाही. या रकमेवर त्याला टॅक्स भरावा लागणार आहे. खरंतर कोणत्याही शो किंवा बक्षिसाच्या रकमेवर 30 टक्के कर भरावा लागतो. त्यानुसार गौरवलाही त्याच्या 50 लाख रुपयांच्या बक्षिसाच्या रकमेवर 30 टक्क्यांनुसार 15.6 लाख रुपये टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे त्याला जवळपास 34.4 लाख रुपयेच घरी नेता येणार आहेत.

शो जिंकल्यानंतर गौरव खन्नाची पहिली पोस्ट

शो जिंकल्यानंतर गौरव खन्नाच्या टीमकडून सोशल मीडियावर पहिली पोस्ट लिहिण्यात आली आहे. पत्नीसोबतचा फोटो शेअर करत टीमने लिहिलं, ‘तीन महिन्यांचा प्रवास अखेर संपला.. आणि शेवट काय होता! ट्रॉफी घरी आली आहे. ते विचारत राहिले की, जीके काय करणार? आणि जसं की मी नेहमी म्हणत आलो की, जीके सर्वांसाठी ट्रॉफी घरी आणणार. त्याने असंच केलंय. हा संपूर्ण प्रवास खूप रंजक आणि उत्साहपूर्ण होता. हा त्या प्रत्येक व्यक्तीचा विजय आहे, ज्याने गौरववर विश्वास ठेवला, त्याच्यासाठी मत दिलं आणि त्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले. हा फक्त एका ट्रॉफीचा जल्लोष नाही. तर हा विश्वास आणि प्रेमाचा जल्लोष आहे.’