Bigg Boss 20: बादशाहच्या घटस्फोटावर सलमान खान स्पष्टच बोलला; कोणालाही तो अधिकार देऊ नका..

Bigg Boss 20: प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाहची पूर्व पत्नी ईशा रिखी बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. प्रीमिअरच्या एपिसोडमध्ये सलमानने तिला महत्त्वाचा सल्ला दिला. तो नेमकं काय म्हणाला, ते जाणून घ्या..

Bigg Boss 20: बादशाहच्या घटस्फोटावर सलमान खान स्पष्टच बोलला; कोणालाही तो अधिकार देऊ नका..
बादशाह-ईशा रिखी, सलमान खान
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 06, 2026 | 10:35 PM

Bigg Boss 20: अभिनेत्री ईशा रिखी नुकतीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. गायक आणि रॅपर बादशाहसोबत विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर ती आता सलमान खानच्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 20’मध्ये सहभागी झाली आहे. शोच्या ग्रँड प्रीमियरमध्ये ईशाने बादशाहचं नाव न घेता त्यांच्या नात्याबद्दल आणि विभक्त झाल्यानंतरच्या मानसिक अवस्थेबद्दल भाष्य केलं. यावेळी सलमान खानने तिचं सांत्वन करत तिला पुढे जाण्याचा सल्ला दिला. ‘बिग बॉस 20’मधील परिचयाच्या व्हिडीओमध्ये ईशाने तिच्या आयुष्यातील कटू आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी ती बॉलिवूड आणि पंजाबी सिनेमात काम करत होती आणि तो काळ तिच्या आयुष्यातील सर्वात चांगला टप्पा असल्याचं तिने सांगितलं. मात्र, प्रेमात पडल्यानंतर तिच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं.

ईशाने सांगितलं, “त्यानंतर मी प्रेमात पडले. मला वाटलं की हेच ते आहे, ज्याचा मी शोध घेत होते. तो केवळ ग्रीन फ्लॅग नव्हता, तर संपूर्ण ग्रीन फॉरेस्ट होता. मला लग्न करून स्थिरस्थावर व्हायचं होतं. त्यामुळे मी खूप प्रयत्न केले. पण काही अनुभव तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकतात. जेव्हा तुमचा विश्वास तुटतो, तेव्हा तुम्ही अशा टप्प्यावर पोहोचता की, ‘माझं कुठे चुकलं?’ असा प्रश्न स्वतःलाच विचारू लागता. मी जे काही सहन केलं, त्याने मी पूर्णपणे खचले आहे.”

मात्र, या अनुभवाचा तिला पश्चात्ताप नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. “मला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नाही. ‘बिग बॉस’मध्ये मी माझ्या सावलीतून बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आले आहे. या शोमधून विजेती म्हणून बाहेर पडणं हे माझं ध्येय असेल,” असं ईशाने सांगितलं. यानंतर ईशाची सलमान खानसोबत भेट झाली. सलमान तिला म्हणाला, “सगळ्यांचे ब्रेकअप होतात. तू कोणासमोर उभी आहेस, हे तुला माहीत आहे ना?”

सलमानने पुढे तिला वैयक्तिक आयुष्याबद्दल महत्त्वाचा सल्लाही दिला. “आपले वैयक्तिक प्रश्न वैयक्तिकच राहायला हवेत. समोरची व्यक्ती खूप आधीच पुढे निघून गेली आहे. त्यामुळे कोणालाही तुम्हाला भावनिकदृष्ट्या दुखावण्याचा अधिकार देऊ नका. वर्तमानावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या स्पर्धकांवर लक्ष ठेवा,” असं सलमान म्हणाला.

दरम्यान, बादशाह आणि ईशा रिखी यांनी त्यांचं नातं बराच काळ प्रसिद्धीपासून दूर ठेवलं होतं. 2026 मध्ये त्यांच्या लग्नाची माहिती समोर आली. मार्चमध्ये ईशाच्या आईने खासगी विवाह सोहळ्यातील काही झलक सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर ईशाने इंस्टाग्रामवरील ‘आस्क मी एनीथिंग’ सत्रादरम्यान बादशाहसोबत लग्न झाल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us