
डिसेंबरचा महिना आला की अनेकांकडे सनई-चौघडे वाजण्यास सुरुवात होते. लग्नसराईच्या या काळात अनेकजण बोहल्यावर चढतात. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकला होता. त्यानंतर आता आणखी एका बिग बॉस फेम अभिनेत्याचा साखरपुडा पार पडला आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून जय दुधाणे आहे. ‘बिग बॉस मराठी 3’मध्ये त्याने भाग घेतला होता आणि त्यात तो उपविजेता ठरला होता. जयने गर्लफ्रेंड हर्षला पाटीलशी साखरपुडा केला असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या साखरपुड्यानंतर जय आणि हर्षला लगेचच लग्न करणार आहेत. नुकताच त्यांच्या हळदीचाही कार्यक्रम पार पडला आहे. या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
जयची होणारी पत्नी ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स असून फॅशन आणि ट्रॅव्हलसंदर्भातील व्हिडीओ ती पोस्ट करते. जय आणि हर्षला गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत या दोघांचा साखरपुडा पार पडला. यावर्षी मार्च महिन्यात जयने त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. हर्षलाला प्रपोज करतानाचे फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. उत्तराखंडच्या ट्रिपदरम्यान जयने तिला अत्यंत रोमँटिक पद्धतीने प्रपोज केलं होतं.
‘बिग बॉस मराठी’शिवाय जयला एमटीव्ही स्प्लिट्सव्हिलामुळेही प्रचंड लोकप्रियता मिळाली. जयनं या शोचं विजेतेपद पटकावलं होतं. तेव्हापासूनच तो तरुणाईमध्ये चर्चेत आहे. जयनं काही मराठी मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलंय. ‘वेड लागलं प्रेमाचं’ आणि ‘गडद अंधार’ यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकला. तो लवकरच महेश मांजरेकरांच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गेल्या काही दिवसांत बऱ्याच मराठी कलाकारांचा लग्नसोहळा, साखरपुडा पार पडला. प्राजक्ता गायकवाड-शंभुराज खुटवड, कोमल कुंभार, पूजा बिरारी-सोहम बांदेकर यांनी लग्न करत आयुष्याती नवी सुरुवात केली. तर अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा नुकताच साखरपुडा पार पडला.