
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण हा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. एका अतिशय गरीब घरातून आलेला मुलगा बिग बॉस जिंकला यातच सर्वांना आनंद होता. आता सूरजच्या जीवनावर आधारित ‘झापुक झुपूक’ हा सिनेमा येत आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे. तुम्ही हा टीझर पाहिला नसेल तर नक्की पाहा…
काय आहे चित्रपटाचा टीझर?
‘झापुक झुपूक’ सिनेमाच्या टीझरमध्ये चित्रपटाची थोडीशी झलक पहायला मिळते, सूरजची कॉमेडी, हटके स्टाईल त्याचा भन्नाट अभिनय आणि फुल्ल ऑन मनोरंजन सिनेमामध्ये अनुभवायला मिळणार असल्याचे दिसत आहे. या चित्रपटात सूरज चव्हाणची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये सूरज एका मुलीच्या प्रेमात असल्याचे दिसत आहे. तसेच तो ‘म्हणतो मार्केट गाजवायला आणि पोरीला लाजवायला सूरज चव्हाणच्या नजरेतच दम आहे’ असे अनेक डायलॉग बोलताना दिसत आहे.
हालाखीच्या परिस्थितीतून वर येऊन सूरजने प्रसिद्धी मिळवत माणुसकी जपली. त्याची अकल्पनीय आणि प्रशंसनीय मेहनत आता मोठ्या पद्यावर पाहायला मिळणार आहे. एका ग्रामीण भागातील हा मुलगा त्याच्या चित्रपटासाठी सध्या भरपूर चर्चेत आहे, मराठी मातीतल्या या साध्या भोळ्या सूरजसाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ निर्माण झाली आहे.
सिनेमामध्ये कोणते कलाकार दिसणार?
सूरज चव्हाणसोबत या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात एक धमाल लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी चित्रपटाचा टीझर प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोवर अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत.