थलपती विजय यांचा शपथविधी सोहळा, पण चर्चा मात्र त्रिशाचीच; खास लूकमध्ये दिसली अभिनेत्री
अभिनेते विजय यांचा शपथविधी सोहळा चेन्नईमधल्या नेहरू स्टेडियममध्ये पार पडत आहे. या शपथविधी सोहळ्यात सर्वांच्या नजरा अभिनेत्री त्रिशा कृष्णनवरच खिळल्या होत्या. यावेळी तिने निळ्या रंगाची साडी नेसली होती.

निळ्या रंगाची रेशमी साडी नेसून अभिनेत्री त्रिशा कृष्णन आज (रविवारी) ‘तमिळगा वेत्री कझगम’चे प्रमुख सी. जोसेफ विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये दाखल झाली. चेन्नई इथल्या निवासस्थानातून निघताना त्रिसा म्हणाली, “मी या ऐतिहासिक सोहळ्याची साक्षीदार होण्यासाठी उत्सुक आहे.” यावेळी तिच्यासोबत तिची आई उमा कृष्णनसुद्धा होत्या. शपथविधी सोहळ्यासाठी त्रिशाने सोनेरी नक्षीकाम असलेल्या आकर्षक निळ्या रंगाची रेशमी साडी नेसली आहे. साडीवर साजेसे दागिने, मिनिमल मेकअप आणि केसांत मोगऱ्याचा गजरा.. असा तिचा हा लूक आहे.
तमिळनाडूमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या टीव्हीके पक्षाने 108 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष म्हणून आपलं स्थान निर्माण केलं. त्यांनी डीएमके आणि एआयएडीमके या दोन्ही पक्षांचा पराभव केला. तमिळनाडूच्या राजकारणातील हा ऐतिहासिक विजय आहे. 4 मे रोजी विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच त्रिशाने तिरुपती मंदिराला भट दिली होती. याच दिवशी तिचा वाढदिवससुद्धा होता. सकाळी मंदिरात बालाजी यांचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी ती विजय यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचली होती.
पहा त्रिशाचा व्हिडीओ-
#WATCH | Tamil Nadu: Actor Trisha Krishnan leaves from her residence in Chennai. pic.twitter.com/M7XFTKyKSt
— ANI (@ANI) May 10, 2026
विजय यांनी शनिवारी संध्याकाळी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन 120 सदस्यांच्या पाठिंब्याचं पत्र सोपवलं. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्याबळावरून सुरू असलेलं नाट्य अखेर संपुष्टात आलं. आज (रविवार) सकाळी दहा वाजता चेन्नई इथल्या नेहरू स्टेडियमवर विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा सुरू झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधीसुद्धा यावेळी उपस्थित आहेत. व्हीसीके आणि आयएमयूएल या पक्षांनी पाठिंब्याचं पत्र सोपवल्यानंतर तमिळनाडू विधानसभेत सत्तारुढ सदस्यांचं संख्याबळ बहुमताच्या पलीकडे गेलं. गेल्या दोन दिवसांपासून बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेची धावपळ सुरू होती.
त्रिशा आणि विजय यांची जोडी तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांनी घिली, तिरुपाची, आथी, कुरवी, लिओ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. गेल्या काही काळापासून या दोघांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा आहेत. विजय यांची पत्नी संगीता सोरनलिंगमने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली. कारण संगीताने तिच्या घटस्फोटाच्या अर्जात विजय यांचं एका अभिनेत्रीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतरही विजय आणि त्रिशा एका लग्नसोहळ्याला एकत्र उपस्थित होते.