
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना अभिनेत्रींना अनेक वाईट अनुभव येतात. तर कधी कधी अभिनेत्रींना त्यांच्या खासगी आयुष्यात देखील अनेक विचित्र घटनांना सामोरे जावे लागते. नुकताच एका अभिनेत्रीने तिला आलेला वाईट अनुभव सांगितला आहे. एका व्यक्तीने तिच्या पँटीमध्ये हात घातल्याचे सांगितले आहे. आता नेमकं काय घडलं होतं चला जाणून घेऊया…
नेमकं काय घडलं
अभिनेत्री गौतमी कपूरला शाळेत शिकत असताना एक वाईट अनुभव आला होता. तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, शाळेचा गणवेश घालून बसमधून घरी परतत असताना ही घटना घडली. ती म्हणाली, “मी सहावीत होते, शाळेतून घरी परतत होते. एका माणसाने माझ्या पँटच्या आत हात घातला.” या अनुभवाने ती पूर्णपणे हादरून गेली होती. घरी पोहोचल्यानंतर तिने ही घटना आपल्या आईला सांगितली. तिच्या आईने तिला धैर्याने अशा प्रसंगांना सामोरे जाण्याचा सल्ला दिला. गौतमी यांनी सांगितले, “माझी आई मला म्हणाली, ‘तू वेडी आहेस का? तू त्याला थोबाडीत मारायला हवी होती किंवा त्याची कॉलर पकडायला हवी होती.’ तिने मला कधीही घाबरू नको, असे सांगितले.”
वाचा: लहानपणी आई-वडिलांचे निधन, आश्रमात मोठी झाली अभिनेत्री; मुंबईत दिग्दर्शकासोबत वाईट अनुभव
आईचा सल्ला आणि धडा
गौतमीच्या आईने तिला अशा परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन केले. ती म्हणाली, “तिने मला सांगितले की, जर कोणी असे काही करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा हात घट्ट पकडायचा, मोठ्याने ओरडायचे आणि घाबरायचे नाही. जर तुला भीती वाटत असेल तर रेड चिली स्प्रे जवळ ठेव आणि त्यांच्या चेहऱ्यावर मार. किंवा बूट काढून त्यांना मार. तुला काही होणार नाही.” या सल्ल्याने गौतमीला भविष्यात अशा परिस्थितींना सामोरे जाण्याचे बळ मिळाले.
बालपणीपासूनच प्रवास
गौतमीने हेही उघड केले की, तिच्या कुटुंबाकडे गाडी नव्हती, त्यामुळे तिला वयाच्या पाचव्या वर्षापासूनच बसमधून प्रवास करावा लागला होता. कॉलेजच्या काळातही ती बसमधूनच प्रवास करायची. तिने सांगितले की, त्या काळात तिला ट्रेनने प्रवास करणेही सुरक्षित वाटायचे. मात्र, ही घटना तिच्या आयुष्यातील एक वेदनादायक आठवण बनून राहिली आहे.
गौतमीच्या कामाविषयी
गौतमी कपूरने अनेक लोकप्रिय मालिकांमधून आपली ओळख निर्माण केली आहे. तिने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘कसम से’, आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. अलीकडेच ती ‘ग्यारह ग्यारह’ या सीरिजमध्ये दिसली होती, जी कोरियन ड्रामा ‘सिग्नल’चे भारतीय रूपांतर आहे. गौतमी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.