
बॉलीवूडमध्ये कधी काय होईल काही सांगता येत नाही. अनेकदा पडद्यामागच्या अशा अनेक कथा असतात ज्याबद्दल प्रेक्षकांना फार कमी माहित असतं. जसं की, काही स्टार्स या इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमावतात. तसेच काहीजण पहिल्याच चित्रपटानंतर रातोरात स्टार झालेत अन् अचानक गायबही झाले आहेत. ज्याचा थांगपत्ता आजपर्यंत लागला नाही. नाही प्रेक्षकांना आजपर्यंत याबद्दल काही समजलं आहे. काही सेलिब्रिटींचे गायब होणं तर कुटुंबाला किंवा मित्रांनाही माहिती नाही. या स्टार्सचे अशा प्रकारे गायब होणे आजही एक गूढच आहे. असेच काही 5 कलाकार आहेत जे 20-30 वर्षांपासून बेपत्ता आहेत. कोण आहेत हे सेलिब्रिटी जाणून घेऊयात.
‘वीराना’ची रहस्यमय नायिका जस्मिन धुन्ना
1988 मध्ये आलेल्या ‘वीराना’ या हॉरर चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री जास्मिन धुन्ना अजूनही तिच्या बोल्ड लूक आणि रहस्यमय व्यक्तिरेखेसाठी लक्षात राहते. पण ‘वीराना’च्या यशानंतर, जास्मिन अचानक चित्रपटसृष्टीतून गायब झाली. काही वृत्तांनुसार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम देखील तिच्या सौंदर्याने प्रभावित झाला होता. त्याचे लोक तिचा पाठलाग करू लागले होते. वारंवार येणाऱ्या धमकीच्या फोनमुळे त्रासून तिने घराबाहेर पडणेच बंद केले आणि नंतर देशच सोडला. ती जेव्हा इंडस्ट्रीमधून गायब झाली तेव्हा अनेक वर्षे तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतु 2017 मध्ये रामसे ब्रदर्सचे श्याम रामसे यांनी दावा केला की जास्मिन मुंबईत आहे, तिने स्वतःला लाइमलाइटपासून दूर ठेवले आहे. त्याच वेळी, अभिनेता हेमंत बिर्जे यांनी सांगितले होते की, जास्मिनने अमेरिकेत लग्न केले आणि आता ती तिथेच राहते.
हिट चित्रपट दिल्यानंतर राज किरण गायब
80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता राज किरण यांनी ‘बसेरा’, ‘अर्थ’, ‘घर एक मंदिर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला होता. पण त्यांच्या कारकिर्दीत घसरण झाल्यानंतर ते नैराश्यात गेले आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांना मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ते पूर्णपणे बेपत्ता झाले. त्यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी, कोणीही त्यांना आता कुठे आहे हे माहित नाही. काही वृत्तांतात असा दावा करण्यात आला आहे की ते न्यू यॉर्कमध्ये टॅक्सी चालवत आहेत, तर ऋषी कपूर यांनी सांगितले होते की ते अमेरिकेच्या मानसिक आरोग्य संस्थेत आहेत. दीप्ती नवल यांनी असेही म्हटले होते की ते अमेरिकेत दिसले होते. आजही त्यांच्या कुटुंबाला त्यांची कोणतीही खबर नाही.
विशाल ठक्कर
‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘चांदनी बार’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता विशाल ठक्कर 2016 पासून बेपत्ता आहे. असे म्हटले जाते की तो चित्रपट पाहण्यासाठी गेला होता आणि तो कधीच घरी परतला नाही. त्याच्या आईने सांगितले की विशालने त्या रात्री त्याच्या वडिलांना मेसेज केला होता की तो एका पार्टीला जात आहे आणि उद्या येईल, पण दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्याचा पत्ताच लागला नाही. त्याच्याकडे फक्त 500 रु होते. आज 9 वर्षे उलटून गेली आहेत, पण कुटुंब अजूनही त्याची वाट पाहत आहे. या घटनेच्या काही महिन्यांपूर्वी, अभिनेत्याचे त्याच्या मैत्रिणीशी भांडण झाले होते आणि त्याच्यावर बलात्काराचा आरोपही करण्यात आला होता, ज्यामुळे तो खूप अस्वस्थ होता. पण अद्यापपर्यंत त्याची कोणतीही माहिती मिळाली नाही.
ऋषी कपूरची सहकलाकार काजल किरण
‘हम किसी से कम नहीं’ या चित्रपटात ऋषी कपूरसोबत दिसलेली काजल किरण कोण विसरू शकेल? काजल, जिचे खरे नाव सुनीता कुलकर्णी आहे, तिने 90 च्या दशकात ‘आखरी संघर्ष’ सारख्या चित्रपटात काम केले होते, परंतु 1997 नंतर ती पूर्णपणे गायब झाली. 2016 मध्ये, ऋषी कपूर यांनी स्वतः सोशल मीडियावर विचारले होते की काजल किरण आता कुठे आहे आणि ती कशी आहे, पण त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. 27 वर्षांपासून काजलची कोणतीही बातमी नाही, तसेच कोणतीही माहिती नाही.
‘राज’ अभिनेत्री मालिनी शर्मा
बिपाशा बसू आणि दिनो मोरिया यांच्या ‘राज’ या सुपरहिट चित्रपटात मालिनी शर्माने भूताची भूमिका साकारली होती, हे लोकांनी खूप कौतुकास्पद मानले. पण या चित्रपटानंतर लगेचच मालिनीने इंडस्ट्री सोडली आणि आजपर्यंत ती कुठेही दिसली नाही. तिचा पहिला चित्रपट हिट झाला होता, पण तरीही तिने ग्लॅमरच्या दुनियेला अलविदा म्हटले. आता ती कुठे आहे आणि काय करते याची कोणालाही कल्पना नाही.