Ira Khan: “असं वाटतंय आता सगळंच संपणार”; आमिर खानच्या मुलीला येतायत एंग्झायटी अटॅक्स

| Updated on: May 01, 2022 | 12:43 PM

आयराने (Ira Khan) याआधीही नैराश्याला सामोरं गेल्याचं सांगितलं होतं. गेल्या काही वर्षांपासून ती तिच्या मानसिक आरोग्यासाठी उपचारसुद्धा घेतेय. ऑक्टोबर 2020 मध्ये तिने सांगितलं की तिला क्लिनिकल डिप्रेशनचं निदान झालं.

Ira Khan: असं वाटतंय आता सगळंच संपणार; आमिर खानच्या मुलीला येतायत एंग्झायटी अटॅक्स
Ira Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आयरा अनेकदा तिच्या मानसिक आरोग्याविषयी सोशल मीडियावर मोकळेपणे व्यक्त झाली. आता पुन्हा एकदा तिने इन्स्टाग्रामवर एंग्झायटी अटॅक्सबद्दलची पोस्ट लिहिली आहे. आयराला एंग्झायटी अटॅक्स (anxiety attacks) येत असल्याचं तिने या पोस्टद्वारे सांगितलं आहे. आयराने याआधीही नैराश्याला सामोरं गेल्याचं सांगितलं होतं. गेल्या काही वर्षांपासून ती तिच्या मानसिक आरोग्यासाठी उपचारसुद्धा घेतेय. तिच्या या पोस्टमध्ये एंग्झायटी अटॅक्सबद्दल बोलताना आयराने असंही म्हटलंय की बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत बोलल्यामुळे आणि काही श्वसनाचे व्यायाम केल्याने तिला त्यात बरीच मदत होतेय.

“एंग्झायटी अटॅक्स येऊ लागले आहेत. मला आधीही एंग्झायटीचा त्रास होता आणि त्यामुळे माझं मन सतत भरून यायचं. सतत मला रडावंसं वाटायचं. पण याआधी मला कधीच एंग्झायटी अटॅक आले नव्हते. पॅनिक आणि पॅनिक अटॅक्समध्ये फरक असतो. तसंच एंग्झायटी विरुद्ध एंग्झायटी अटॅक्स. याबद्दल जेवढी माहिती मला आहे, त्यानुसार एंग्झायटी अटॅक्सची शारीरिक लक्षणं दिसून येतात. उदाहरणार्थ धडधडणं, धाप लागणं, रडण्यासारखं वाटणं. या गोष्टी हळूहळू वाढत जातात आणि एकेदिवशी सगळंच संपेल असं वाटतं. सध्या मी अशाच गोष्टींचा सामना करतेय. पॅनिक अटॅक कसे असतात याबद्दल मला माहित नाही”, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

मानसिक आजाराविषयी घेत असलेल्या उपचारांबद्दल ती पुढे म्हणाली, “हा खरोखरंच खूप विचित्र अनुभव आहे. माझ्या थेरपिस्टने असं सांगितलंय की जर हे सतत (दोन महिन्यांतून एक-दोनदा येण्याऐवजी दररोज येऊ लागले तर) येऊ लागले तर मला माझ्या डॉक्टरांना किंवा मानसोपचारतज्ज्ञांना सांगावं लागेल. जर एखाद्याला कसं वाटतंय हे वर्णन करायचं असेल तर याची थोडीशी मदत होऊ शकेल. यात तुम्हाला खूपच असहाय्य असल्यासारखं वाटतं. कारण मला खरंच झोपायचं असतं आणि त्यामुळे मी नीट झोपूही शकत नाही (मला रात्रीच्या वेळी एंग्झायटी अटॅक्स येत आहेत). मी कोणत्या गोष्टींना घाबरतेय याचा विचार करतेय, आत्मपरिक्षण करतेय. पण एकदा का एंग्झायटी अटॅक येऊ लागला की मी त्याला थांबवू शकत नाही. तुम्हाला ते सहन करून त्यातून बाहेर पडावं लागेल, हेच मला आतापर्यंत समजलंय.”

आयराची पोस्ट-

बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी बोलल्यामुळे आणि श्वसनाच्या काही व्यायामांमुळे थोडीफार मदत होत असल्याचं तिने सांगितलं. मात्र पुन्हा एखाद्या गोष्टीचा ताण येऊ लागला, तर ती गोष्ट पुन्हा तुमच्यात वाढू लागते, असंही तिने म्हटलंय. आयराच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री श्रुती हासनने त्यावर हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत.

ऑक्टोबर 2020 मध्ये तिने सांगितलं की तिला क्लिनिकल डिप्रेशनचं निदान झालं. “मी डिप्रेस आहे. मला आता चार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा क्लिनिकल डिप्रेशनचं निदान झालं. सध्या त्यात बरीच सुधारणा झालीये. गेल्या वर्षभरापासून मला मानसिक आरोग्याविषयी काहीतरी करायचं होतं, पण नेमकं काय करावं हे मला कळत नव्हतं. म्हणून मी तुम्हाला माझ्या या प्रवासात सोबत घ्यायचं ठरवलंय. यातून आपण मानसिक आजाराविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू” असं आयराने एका व्हिडीओद्वारे म्हटलं होतं.