अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाची देशभरात चर्चा, म्हणाले, ही फक्त सुरुवात…

अभिनेते अनुपम खेर यांचा तन्वी द ग्रेट हा चित्रपट जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अनुपम खेर यांच्या तन्वी द ग्रेट चित्रपटाची देशभरात चर्चा, म्हणाले, ही फक्त सुरुवात...
anupam kher and tanvi the great
| Updated on: Jun 25, 2025 | 6:05 PM

Tanvi The Great : दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांना आजघडीला वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्यांनी आतापर्यंत शेकडो चित्रपटांत काम केलेलं आहे. फक्त हिंदीच नव्हे तर अन्य भाषांच्या चित्रपटांतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता मात्र हेच अनुपम खेर ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटाच्या माध्यमातून एका नव्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यांनी या चित्रपटात फक्त अभिनयच नव्हे तर दिग्दर्शकाचीही जबाबदारी पार पाडलेली आहे. याच चित्रपटाबाबत त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून माहिती दिली आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तरीखही त्यांनी सांगितली आहे.

…तर बॉक्स ऑफिसचा मुद्दा गौण ठरतो

अनुपम खेर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या 18 जुलै रोजी देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर येत्या 30 जून रोजी येणार आहे. याच चित्रपटाबाबत त्यांनी माहिती दिली असून या चित्रपटाबाबत लोकांच्या खूप चांगल्या भावना आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच लोकांच्या प्रेमापुढे बॉक्स ऑफिसचे कलेक्शन दुय्यम ठरते, असेही मत अनुपम खेर यांनी व्यक्त केले.

अनुपम खेर नेमकं काय म्हणाले?

अनुपम खेर यांच्या तन्वी द ग्रेट या चित्रपटाच्या परिक्षणाचा संदर्भ अनुपम खेर यांनी दिला आहे. तन्वी द ग्रेट चित्रपटाच्या परिक्षणाच्या अशा प्रकारच्या हेडिंग वाचून फार आनंद झाला. मी गेल्या 40 वर्षांपासून सिनेसृष्टीत कार्यरत आहे. मात्र माझ्या संपूर्ण करिअरमध्ये अशा प्रकारची स्तुती मी कधीही पाहिलेली नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या मनापासून एखाद्या चित्रपटाची निर्मिती करता तेव्हा बॉक्स ऑफिसचं कलेक्शन फार महत्त्वाचं ठरत नमाही. अशा प्रकारचे रिव्ह्यू पाहिल्यानंतर बॉक्स ऑफिसची कमाई लक्षात ठेवण्याचीही गरज नाही. तन्वी द ग्रेट या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानतो. मला वाटतं तन्वी द ग्रेट या चित्रपटाच्या प्रवासाही ही फक्त सुरुवात आहे, अशा भावना अनुपम खेर यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, येत्या 18 जुलै रोजी हा चित्रपट सिनेमागृहांत पाहायला मिळणार आहे. तर येत्या 30 जून रोजी या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज केले जाईल. त्यामुळे या चित्रपटात नेमके काय असणार आहे? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.