Dilip Kumar Death: भर कोर्टात सांगितलं ‘माझं मधुबालावर प्रेम’, वडील मारतील म्हणून नाव बदललं; दिलीप कुमार यांचे हे किस्से माहीत आहे का?

| Updated on: Jul 07, 2021 | 11:13 AM

अभिनयाचं विद्यापीठ, ट्रॅजेडी किंग म्हणून ओळख असणारे आणि अनेक पिढ्यांवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. (Dilip Kumar Passed Away)

Dilip Kumar Death: भर कोर्टात सांगितलं माझं मधुबालावर प्रेम, वडील मारतील म्हणून नाव बदललं; दिलीप कुमार यांचे हे किस्से माहीत आहे का?
dilip kumar-madhubala
Follow us on

मुंबई: अभिनयाचं विद्यापीठ, ट्रॅजेडी किंग म्हणून ओळख असणारे आणि अनेक पिढ्यांवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. ज्या काळात सिनेमात काम करणाऱ्यांकडे नाके मुरडली जायची त्याकाळात दिलीप कुमार यांनी सिनेसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला. दिलीप कुमार बॉलिवूडमध्ये कसे आले? त्यांना दिलीप कुमार हे नाव कसं पडलं? मधुबालावरील त्यांच्या निर्वाज्य प्रेमाची कहाणी काय होती? याचा घेतलेला हा आढावा. (dilip kumar confess in court love with madhubala, read full story)

वडिलांच्या भीतीने नाव बदललं

दिलीप कुमार यांचा नाव बदलण्याचा किस्सा मजेदार आहे. दिलीप कुमार यांचं खरं नाव मोहम्मद युसूफ खान होतं. सिनेमात येण्यासाठी त्यांनी त्यांचं नाव बदललं. त्यांच्या वडिलांना फिल्मी दुनिया आवडत नव्हती. आपल्या मुलाने या क्षेत्रात यावं असं त्यांना वाटत नव्हतं. स्वत: दिलीप कुमार यांनी हा किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. माझ्या वडिलांच्या माराच्या भीतीने मी नाव बदललं. सिनेमात काम करण्यास माझ्या वडिलांचा विरोध होता. त्यांच्या मित्राचा मुलगा पृथ्वीराज कपूर सिनेमात काम करत होते. त्यावेळी माझे वडील मित्राच्या घरी जायचे. तुमचा मुलगा काय काम करतोय? अशी तक्रार करायचे. जेव्हा मी सिनेमा क्षेत्रात आलो तेव्हा वडिलांना माहीत पडलं तर ते नाराज होतील, याची मला भीती वाटली. त्यामुळे माझ्या समोर दोन तीन नावांचा प्रस्ताव ठेवला गेला. दिलीप कुमार नाव ठेवावं किंवा वासुदेव नाव ठेवावं असं मला सांगितलं गेलं. युसूफ खान हे नाव कायम ठेवण्याचा सल्लाही दिला गेला. पण मला ते नाव ठेवायचं नव्हते. काही दिवसानंतर मी पेपरमध्ये एक जाहिरात पाहिली. त्यावेळी माझं नाव दिलीप कुमार ठेवल्याचं मला कळलं, असं दिलीप कुमार यांनी सांगितलं होतं.

प्रेमाचा ‘तराना’

मधुबाला आणि दिलीप कुमार यांचं प्रेम ही बॉलिवूडमधील अख्यायिका बनून राहिली आहे. अगदी आजच्या पिढीतही मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमावर भरभरून बोललं जातं. दिलीप कुमार-मधुबाला यांच्या प्रेमाची कहाणी 1951पासून सुरू झाली. ‘तराना’ फिल्मच्या सेटवर दोघे भेटले होते. दोघांची नजरानजर झाली आणि पहिल्याच भेटीत दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. प्रेमाचं प्रतिक म्हणून मधुबालाने दिलीप कुमार यांच्या मेकअप रुममध्ये एक चिठ्ठी आणि गुलाब पाठवलं होतं. जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर या गुलाबाचा स्वीकार करा, असं या चिठ्ठीत लिहिलं होतं. चिठ्ठी वाचल्यावर दिलीप कुमार यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले आणि त्यांनी मधुबालाच्या प्रेमाचा स्वीकार केला.

मधुबालाच्या वडिलांची एन्ट्री

दिलीप कुमार आणि मधुबाला दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. जिथे मधुबालाच्या सिनेमाची शुटिंग असायची तिथे दिलीपसाब हजर असायचेच. इतकं त्यांचं मधुबालावर निर्व्याज प्रेम जडलं होतं. मात्र, या प्रेमात मिठाचा खडा पडला. मधुबालाचे वडील अताउल्ला खान यांच्या एन्ट्रीमुळे दोघांना भेटणं मुश्किल झालं. खान मधुबालावर नजर ठेवून असायचे. शुटिंग स्थळी हजर राहायचे. एवढेच नव्हे तर दिग्दर्शकाच्या कामात ढवळाढवळही करायचे. ‘नया दौर’ सिनेमाचं आऊटडोअर शुटिंग होतं. भोपाळला जायचं होतं. मात्र, त्याला अताउल्ला खान यांनी विरोध केला. दिलीप कुमार आणि मधुबाला आपल्या नजरेच्या बाहेर राहू नये म्हणून त्यांनी विरोध केल्याचं सांगितलं जात होतं.

होय, मधुबालावर माझं प्रेम आहे

खान यांच्या या ताठर भूमिकेमुळे बीआर चोपडा यांनी मधुबाला यांच्या जागी वैजंयतीमाला यांना घेतलं. नया दौर चित्रपटाच्या जाहिरातीत मधुबालाच्या फोटोवर काट मारलेला फोटो त्यांनी वर्तमान पत्रात छापला. त्यामुळे खान भडकले. त्यांनी मधुबालाच्या सर्व चित्रपटांची यादी तयार केली आणि नया दौर सिनेमावर काट मारून ही यादी छापली. त्यामुळे चोपडाही भडकले आणि हे प्रकरण कोर्टात गेलं. तेव्हा होय, मी मधुबालावर प्रेम करतो आणि करत राहील, असं दिलीप कुमार यांनी निक्षून सांगितलं. कोर्टात मधुबालावरील निर्व्याज्य प्रेमाची जाहीर कबुल देणाऱ्या दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या संबंधात पुढे कटुता आली. ती एवढी की मुगल ए आझमच्या सेटवर दोघे एकमेकांशी बोलतही नव्हते. पुढे दिलीपकुमार यांनी सायरा बानो यांच्याशी लग्न केलं. (dilip kumar confess in court love with madhubala, read full story)

 

संबंधित बातम्या:

Dilipkumar Death | ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन, बॉलिवूडवर शोककळा

Dilip Kumar Death: दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी सायकलवरून गेलो होतो, शरद पवारांनी जागवल्या ट्रॅजेडी किंगच्या आठवणी!

Dilip Kumar Passes Away LIVE Update | अभिनेता दिलीपकुमार याचं निधन, न्यूयॉर्क टाईम्सने दिलीपकुमारांवर लेख छापला

(dilip kumar confess in court love with madhubala, read full story)