फिल्मफेअर पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक लीलाधर सावंत काळाच्या पडद्याआड

| Updated on: Oct 21, 2021 | 3:39 PM

चंदेरी झगमगाटाची यशस्वी कारकीर्द व मायानगरीतील सर्वकाही सोडून वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथे वास्तव्य करणाऱ्या लीलाधर सावंत (Leeladhar Sawant ) यांचं दुःखद आजाराने निधन झालं. लीलाधर सावंत यांनी 177 हिंदी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

फिल्मफेअर पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक लीलाधर सावंत काळाच्या पडद्याआड
leeladhar Sawant
Follow us on

मुंबई : चंदेरी झगमगाटाची यशस्वी कारकीर्द व मायानगरीतील सर्वकाही सोडून वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथे वास्तव्य करणाऱ्या लीलाधर सावंत (Leeladhar Sawant ) यांचं दुःखद आजाराने निधन झालं. लीलाधर सावंत यांनी 177 हिंदी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. लीलाधर सावंत यांचं वाशीम येथे एका खासगी रुग्णालयात दीर्घआजाराने दुःखद निधन झाल्याने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

अनेक हिट चित्रपटांचे कला दिग्दर्शक राहिलेले लीलाधर सावंत अनेक अडचणींशी दोन हात करत आपले जीवन जगत होते. लॉकडाऊन दरम्यान लीलाधर सावंत आणि त्यांची पत्नी पुष्पा सावंत यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ते दोघेही सध्या खूप आर्थिक अडचणीत आहेत.

मदतीचे आवाहन देखील केले होते!

त्यांच्या पत्नी पुष्पा सावंत यांनी लीलाधर यांच्यासोबत काम केलेल्या सर्व स्टार्सना आवाहन केले होते. या कलाकारांनी आपल्याला मदत करण्यासाठी हात पुढे करावा, अशी विनंती त्यांनी केली होती. एवढेच नाही तर पुष्पा सावंत यांनी सांगितले होते की, लीलाधर सावंत यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रिया झाल्या होत्या आणि त्यांना दोन ब्रेन हेमरेज अटॅक देखील आले होते. त्यांच्या उपचारामध्ये संपूर्ण जमा भांडवल पूर्ण खर्च झाले होते. एवढेच नाही तर नेहमीच हसतमुख असणाऱ्या लीलाधर यांची जीभ देखील निकामी झाली होती.

गोविंदाच्या कामासाठी केली होती शिफारस!

लीलाधर यांच्या पत्नीने एका प्रसिद्ध वेबसाईटला मुलाखत देताना सांगितले होते की, गोविंदाला चित्रपटात काम मिळावे म्हणून लीलाधर यांनी ‘हत्या’ चित्रपटाचे दिग्दर्शक कीर्ती कुमार यांना गोविंदाची शिफारस केली होती. पुष्पा यांनी सांगितले की, आयुष्यातील एक चांगला टप्पा आता पार पडून गेला आहे. सध्या ते दोघेही भाडेकरू म्हणून एका भाड्याच्या घरात मोठ्या कष्टाने जगत होते.

अनेक पुरस्कारांवर कोरले नाव

कला दिग्दर्शक लीलाधर सावंत यांनी ‘सागर’, ‘हत्या’, ‘100 डेज’, ‘दिवाना’, ‘हद कर दी आपने’ अशा एकूण 177 चित्रपटांना कला दिग्दर्शन केले होते. त्यांना फिल्मफेअर पुरस्कार, माणिकचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लीलाधर सावंत यांना मिळालेल्या पुरस्कारांनी घराची सजावट वाढवत आहेत, पण शेवटी मात्र लीलाधर सावंत यांना ते पुरस्कार काढून त्यावर साचलेली धूळ साफ करणेच नशिबी आले.

कला दिग्दर्शक लीलाधर सावंत हे गेल्या 10 वर्षांपासून त्यांच्या पत्नीसह महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील जऊळका गावात राहत होते. तब्बल 25 वर्षे चित्रपट जगतात काम करणारे लीलाधर सावंत अनेक चित्रपटांसाठी उत्तम सेट बनवायचे.

हेही वाचा :

‘रामायणा’तील आणखी एका पात्राने घेतला जगाचा निरोप, ‘निषाद’ साकारणाऱ्या चंद्रकांत पंड्यांचे निधन

Video | शॉर्ट फिल्मसाठी देबिना बनर्जीने केले मुंडन, सोशल मीडियावर शेअर केला लूक, पाहा व्हिडीओ…

Ananya Panday | प्रसिद्ध अभिनेत्याची लेक अनन्या पांडे, अभिनयामुळे कौतुक तर कधी वक्तव्यांमुळे झालीये ट्रोल!