Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या शर्टलेस फोटोवर गौरीची भन्नाट कमेंट; तुम्ही वाचली का?

शर्टाच्या आठवणीत शाहरुख म्हणतोय, 'तुम होती तो...'

Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या शर्टलेस फोटोवर गौरीची भन्नाट कमेंट; तुम्ही वाचली का?
Shah Rukh Khan
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 26, 2022 | 1:52 PM

मुंबई: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कारण जवळपास चार वर्षांनंतर तो मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. पठाणमध्ये शाहरुख अत्यंत वेगळी भूमिका साकारणार आहे. त्यासाठी त्याने तेवढीच मेहनत घेतली आहे. नुकताच ‘किंग खान’ने चित्रपटातील एक खास लूक इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. शाहरुखच्या या शर्टलेस फोटोवर (Shirtless Photo) चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. विशेष म्हणजे शाहरुखची पत्नी गौरी खाननेही (Gauri Khan) या फोटोवर कमेंट केली आहे. गौरीच्या या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘पठाण’ चित्रपटात शाहरुखचा अत्यंत वेगळा लूक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. इन्स्टाग्रामवरील या फोटोमध्ये त्याची अनोखी हेअरस्टाइल पहायला मिळतेय. त्याचसोबत त्याच्या एट-पॅक ॲब्सने चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय. शाहरुखने जिममध्ये किती मेहनत घेतली असेल, त्याचा अंदाज हा फोटो पाहून सहज येतो.

या शर्टलेस फोटोला शाहरुखने अत्यंत मजेशीर कॅप्शन दिली आहे. ‘मी माझ्या शर्टाला म्हणतोय.. तुम होती तो कैसा होता.. तुम इस बात पे हैरान होती, तुम इस बात पे कितनी हंसती.. तुम होती तो ऐसा होता’, असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय. त्याचसोबत पठाणच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत असल्याचंही त्याने पुढे म्हटलंय.

शाहरुखच्या या शर्टलेस फोटोला अवघ्या 22 तासांत 28 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. त्याच्या या फोटोवर कमेंट करण्याचा मोह गौरी खानलाही आवरला नाही. ‘ओह गॉड, आता तो त्याच्या शर्टाशीही बोलू लागला आहे’, अशी कमेंट तिने केली आहे. गौरीच्या या कमेंटवर 28 हजारांहून अधिक लाइक्स आणि 500 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत.

शाहरुख 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर तो मोठ्या पडद्यावर झळकलाच नाही. आता चार वर्षांनंतर त्याचा चित्रपट प्रदर्शित होतोय. पठाणमध्ये शाहरुखचा ॲक्शन अंदाज पहायला मिळणार आहे.