रावणाची शिवभक्ती गायब, कुंभकर्ण कार्टुन, तर शूर्पणखा ग्लॅम डॉल… ‘रामायणा’तील या 5 चुका दिसल्या का?

रणवीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाने कमाई केली असली तरी, भव्य विषयाला न्याय देताना गंभीर चुका केल्या आहेत. महादेव भक्तीचा विसर, कुंभकर्णाचे चुकीचे चित्रण, सीजीआयचा अतिवापर आणि पात्रांच्या भावनांकडे दुर्लक्ष यामुळे सिनेमा मूळ आत्म्यापासून दूर गेला आहे. शूर्पणखेचे ग्लॅमरस रूप आणि निष्प्रभ लढाईची दृश्ये निराशाजनक ठरली आहेत.

रावणाची शिवभक्ती गायब, कुंभकर्ण कार्टुन, तर शूर्पणखा ग्लॅम डॉल... रामायणातील या 5 चुका दिसल्या का?
Ramayana
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 07, 2026 | 4:48 PM

रणवीर कपूरचा ‘रामायण’ हा सिनेमा आला आहे. या सिनेमाला प्रचंड गर्दी होत आहे. या चित्रपटाने चांगली कमाईही केली आहे. पण ‘रामायणा’सारखा भव्यदिव्य विषय अवघ्या तीन तासाच्या सिनेमात दाखवणं सोपं नाहीये. भावना, व्यक्तिरेखेची प्रतिष्ठा आणि पौराणिक काळ मोठ्या पडद्यावर दाखवणं सोपं नाही. काही प्रमाणात रामायण सिनेमातील निर्माते आणि दिग्दर्शक या गोष्टी हाताळण्यात यशस्वी ठरले आहेत. तर काही ठिकाणी त्यांनी गंभीर चुका केल्या आहेत. या चुका अक्षम्य अशाच आहेत. ज्या गोष्टी मूळ कथेच्या आत्म्याशी निगडीत आहेत, अशा गोष्टीच त्यातून गायब झाल्याचं दिसून आलं आहे.

रणवीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमात अनेक ठिकाणी असं वाटतं निर्मात्यांनी CGI आणि व्हिज्युअल्सच्या नादात कहाणीच्या महत्त्वाच्या गोष्टीच सोडून दिल्या आहेत. सिनेमातील अनेक व्यक्तिरेखांचे चेहरे आणि लूक पाहिले तर त्यात टेक्नॉलॉजी प्रमाणापेक्षा अधिक वापर झाल्याचं दिसून येतं. काही व्यक्तिरेखा कार्टुन वाटत आहेत. काहींचे हावभाव आणि संवादाचा मेळच बसत नसल्याचंही दिसतं.

Loading...

महादेव कनेक्शन विसरले

रामायणात रावण केवळ एक शक्तीशाली राजा आणि खलनायक नाहीये. तर तो महादेवाचा निस्सीम भक्तीही आहे. महादेवाची कठोर तपस्या करणारा, महादेवा प्रति समर्पित भावनेने पूजा करणारा राजा म्हणून रावणाला पाहिलं जातं. पण सिनेमात रावणाची ही बाजूच आलेली नाहीये. या सिनेमात ब्रह्मा आणि विष्णूचे दर्शन होते. पण रावण आणि महादेवाचा संबंध पाहिजे तसा प्रभावशाली पद्धतीने मांडला गेलेला नाहीये. महादेव भक्ती ही रावणाच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट होती, तीच या सिनेमातून गायब असून ही मोठी चूक असल्याचं लक्षात येतं.

कुंभकर्ण कार्टुन वाटतो

कोणतीही ऐतिहासिक किंवा पौराणिक सिनेमा बनवताना त्यातील व्यक्तिरेखा या जिवंत वाटल्या पाहिजे. छोट्या व्यक्तीरेखा असल्या तरी त्याला न्याय दिला पाहिजे. पण रामायणात कुंभकर्णाची व्यक्तीरेखा अत्यंत विचित्र पद्धतीने दाखवली गेली आहे. कुंभकर्णाची भूमिका फैजल मलिकने साकारली आहे. पण त्याचा लूक गंभीर दिसण्याऐवजी कॉमेडी दिसत आहे. जणू काही आपण कुंभकर्णाच्या रुपात कार्टुन पाहतोय की काय असं वाटतं. कुंभकर्ण हे रामायणातील विशाल आणि प्रभावशाली व्यक्तीमत्त्व होतं. ती छाप या सिनेमात दिसत नाहीये.

जंगलातील लढाई

राम, सीता आणि लक्ष्मण जंगलात राक्षसांशी लढताना दाखवले आहेत. हे दृश्य प्रभावहीन झालं आहे. तिन्ही पात्र जंगलात पळताना दिसत आहेत. त्यांच्या मागे राक्षसांचं सैन्य दिसत आहे. या संपूर्ण अॅक्शन सिक्वेन्समध्ये वास्तवता दिसत नाहीये. राक्षसांचा लूक आणि त्यांच्याशी होणारी लढाई अत्यंत नकली वाटते. हे दृश्य अत्यंत हस्यास्पद झालं आहे. समर प्रसंग असतो तेव्हा भीती आणि रोमांच उभा राहिला पाहिजे. पण यात CGI ची बनावटगिरी दिसत आहे.

चक्क राण्या हसल्या

या सिनेमात कैकयी वगळता दशरथांच्या इतर सर्व राण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. त्या राण्यांच्या वाट्याला काहीच महत्त्वाचे संवाद नाहीत. तसेच महत्त्वाच्या भूमिकाही नाहीत. त्या केवळ स्क्रीनवर हसताना दिसत आहेत. केवळ राजमहालाची भव्यता दाखवण्यासाठीच या राण्यांना ठेवलं की काय असं वाटतं. या सिनेमात या राण्याचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या भावभावना दाखवण्याची आवश्यकता होती. पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं.

राक्षसीण कमी, ग्लॅम डॉल अधिक

या सिनेमात रकुल प्रीतने शूर्पणखाची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील तिचा लूक आणि तिची उपस्थिती खटकते. शूर्पणखेला राक्षसीण दाखवण्याऐवजी तिला ग्लॅमरस अंदाजात अधिक दाखवलं आहे. या संपूर्ण सिनेमात तिचा राक्षसी आवतार दिसत नाही. सिनेमात ती ग्लॅम डॉल वाटते. संपूर्ण रामायण जे घडलं त्याला कारणीभूत शूर्पणखा आहे. त्यामुळे तिचं कॅरेक्टर यात अत्यंत महत्त्वाचं आहे. पण तिला पाहिजे तसं प्रभावशाली दाखवलं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us