
मुंबई : काही महिन्यां पूर्वी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia) या दोघांनीही मिळून प्लान्ट बेस्ड मीट प्रॉडक्शन लाँच करण्याचा निर्णय घेतला होता. या द्वारे त्यांनी नव्या व्यवसाय क्षेत्रात जोडीने पदार्पण केले आहे. त्यांनी ‘इमॅजीन मीट्स (Imagine Meats) या नावाने नव्या प्रॉडक्शनची सुरुवात केली आहे. आता त्यांच्या याच बिझनेसला किंग खान अर्थात शाहरुख खान याने आपल्या हटके रोमँटिक स्टाईलने प्रमोशन केले आहे.
दोन्ही हात पसरवून, ‘मै हू ना…’ स्टाईलमध्ये त्याने या प्रोडक्ट्सचे प्रमोशन केले आहे. या साठी त्याने एक खास पोस्ट देखील शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर आणि या हटके स्टाईलवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
My friends @geneliad & @Riteishd were discussing who would launch their Plant Based Meats Venture. I opened my arms wide and said ‘Main Hoon Naa’. I wish the entire team of @ImagineMeats my best as they dish out #TheHappyMeat. It’s live https://t.co/QHj2BxRZO2 go visit. pic.twitter.com/CNEM2BkLuq
— Shah Rukh Khan (@iamsrk) September 10, 2021
अभिनेता रितेश आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख या दोघांनीही मिळून ‘इमॅजीन मीट्स (Imagine Meats) या नावाने नव्या प्रॉडक्शनची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हा जरी मांसाहारी पदार्थ वाटत असला तरीदेखील प्रत्यक्षात तो मांसाहारी पदार्थ नसून शाकाहारी पदार्थ असतो. केवळ त्याला मांसाहारी पदार्थाचं रुप दिलं जातं. प्लान्ट बेस्ड मीट प्रॉडक्शनमध्ये अर्थात शाकाहारी मांसामध्ये पालेभाज्या किंवा अन्य शाकाहारी पदार्थ मांसाप्रमाणे भासतील या पद्धतीने तयार केले जातात.
‘शाकाहारी मांसा’ला ‘वनस्पतींचे मांस’ देखील म्हणतात. वनस्पतींच्या मांसावरील संशोधन बर्याच काळापासून चालू आहे आणि परदेशात यावर बरेच रिसर्च सुरु आहेत. या मांसाबद्दल बोलायचे झाल्यास ते वनस्पतींपासून तयार केले जाते. याचा अर्थ ते थेट वनस्पतींपासून तयार केले जाते, असा होत नाही. हे मांस तयार करण्यासाठी, काही घटक वनस्पती किंवा नैसर्गिक स्त्रोतांकडून घेतले जातात आणि त्या घटकांच्या मिश्रणातून हे शाकाहारी मांस तयार केले जाते. हे मांस तयार करण्यासाठी विशेष तंत्राचा वापर केला जातो. मांस तयार करत असताना पोत, चरबीचा स्त्रोत, रंग, चव इत्यादींवर विशेष लक्ष दिले जाते.
शाकाहारी मांस तयार करत असताना मुख्यतः पोत, अनुभव, चव या तीन गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते. या मांसाच्या पोत मऊ ठेवला जातो आणि या पोतावर विशेष लक्ष दिले जाते. सामान्यत: मांस बाहेर कडक राहते, परंतु तोंडात शिरताच विरघळते. यासाठी, हे मांस बनवताना नारळातील काही घटकांचा वापर केला जातो. कारण, नारळ देखील अशा प्रकारे कार्य करते. त्याच वेळी चवीसाठी ‘लेगहेमोग्लोबिन’चा वापर केला जातो, जो या मांसाला नैसर्गिक रंग देण्यासाठी देखील वापरला जातो. आणखी चवीसाठी त्यात काही नैसर्गिक आणि कृत्रिम फ्लेवर्स वापरले जाता. मात्र, याचा वापर करत असताना देखील विशेष काळजी घेतली जाते. तसेच, या मांसात नैसर्गिक प्रथिने देखील वापरली जातात.
शाकाहारी मांस, सामान्य मांसापेक्षा अधिक फायदेशीर मानले जाते. कारण, त्यात शरीरासाठी हानिकारक असलेल्या घटकांचा वापर टाळला जातो. हे मांस तज्ज्ञांच्या विशेष देखरेखीखाली बनवले जाते. ज्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. तसेच, सामान्य मांसापेक्षा हे मांस पर्यावरणाच्या दृष्टीने देखील अधिक चांगले आहे. यामुळेच रितेश आणि जिनिलियाच्या या नव्या प्रोजेक्टला कलाकार आणि चाहते पसंती देत आहेत.