Singer KK: ‘तुम्हाला गमावल्याचं दु:ख मी 100 वेळा सहन करेन जर..’, केके यांच्या मुलीची पोस्ट वाचून तुमचेही डोळे पाणावतील

| Updated on: Jun 20, 2022 | 9:26 AM

प्रसिद्ध बॉलिवूड गायक केके (Singer KK) यांच्या मुलीने नुकतंच तिच्या वडिलांना गमावलं. 'फादर्स डे'निमित्त पोस्ट लिहिताना केके यांची मुलगी तामरा (Taamara) अत्यंत भावूक झाली होती. यावेळी तिने सोशल मीडियावर वडिलांसोबत तिच्या बालपणीचा खास फोटो पोस्ट केला आहे.

Singer KK: तुम्हाला गमावल्याचं दु:ख मी 100 वेळा सहन करेन जर.., केके यांच्या मुलीची पोस्ट वाचून तुमचेही डोळे पाणावतील
केेके यांच्या मुलीने पोस्ट केला फोटो
Image Credit source: Instagram
Follow us on

रविवारी जगभरात ‘फादर्स डे’ (Father’s Day) साजरा करण्यात आला. या खास दिवसानिमित्त सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांच्या वडिलांसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली. तर काहींनी वडिलांसोबतचे फोटो पोस्ट केले. मात्र हा दिवस काही जणांसाठी भावूक करणारा होता. प्रसिद्ध बॉलिवूड गायक केके (Singer KK) यांच्या मुलीने नुकतंच तिच्या वडिलांना गमावलं. ‘फादर्स डे’निमित्त पोस्ट लिहिताना केके यांची मुलगी तामरा (Taamara) अत्यंत भावूक झाली होती. यावेळी तिने सोशल मीडियावर वडिलांसोबत तिच्या बालपणीचा खास फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबतच तिने काही आठवणी शेअर केल्या आहेत. या फोटोमध्ये केके यांच्यासोबत त्यांची दोन मुलं नकुल आणि तामरा पहायला मिळत आहेत. या फोटोमध्ये केके हे त्यांच्या मुलांना पाठीवर उचलून घेतल्याचं पहायला मिळत आहे. यावेळी मुलांच्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य सर्वकाही सांगून जातंय.

आणखी एका फोटोमध्ये केके यांच्या मांडीवर बसून तामरा की-बोर्ड वाजवताना पहायला मिळतेय. आई-वडिलांचा एकत्र फोटोही तिने शेअर केला आहे. ‘तुम्हाला गमावल्याचं दु:ख मी 100 वेळा सहन करेन, जर त्याचा अर्थ असा असेल की तुम्ही माझ्या वडिलांच्या रूपात एका सेकंदासाठी का होईना पण माझ्यासोबत असाल. बाबा तुमच्याशिवाय आयुष्य अंधकारमय आहे. तुम्ही सर्वात प्रेमळ बाबा होता. कॉन्सर्ट संपल्यावर घरी आल्यावर तुम्ही आम्हाला झोपून मिठी मारण्यासाठी थांबायचे. मला तुमची खूप आठवण येतेय, तुमच्यासोबत जेवणं, जोरजोरात हसणं, किचनमध्ये जाऊन हळूच काहीतरी खाऊन येणं, तुम्हाला माझं गाणं ऐकवणं, छोट्या व्हॉईस नोट्स पाठवणं, त्यावर तुमची प्रतिक्रिया ऐकणं, तुमचा हात पकडणं.. या सर्व गोष्टींची मला खूप आठवण येतेय,’ अशा शब्दांत तामराने भावना व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

‘तुम्ही आम्हाला खूप सुरक्षित, आनंदी आणि प्रेमाची भावना दिली. या जगाला आवश्यक असलेली वास्तविकता तुम्ही होता आणि आता तुम्ही गेल्यानंतर मला त्यातलं काहीच खरं वाटत नाहीये. पण तुमच्या बिनशर्त प्रेमाने नकळत आम्हाला अशा परिस्थितीचा सामना करायलाही शिकवलंय. तुमचं प्रेम हीच आमची ताकद आहे. मी, नकुल आणि मम्मा तुम्हाला अभिमान वाटावा यासाठी दररोज काम करणार आहोत. ज्याप्रकारे तुम्ही आमची काळजी घेतली, त्याप्रकारे आम्ही एकमेकांची काळजी घेऊ. या जगातल्या सर्वोत्तम वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा. तुमची रोज आठवण येते. मला माहित आहे की तुम्ही आमच्याबरोबर आहात’, असं तिने पुढे लिहिलं.

कोलकातामधील नजरुल मंच इथं लाईव्ह शोदरम्यान गायक केके यांचं निधन झालं. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. केके यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली. केके यांनी हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि बंगाली भाषेतही गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांनी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं नव्हतं. दुसऱ्यांची गाणी ऐकत, शिकत त्यांनी आपला प्रवास सुरू केला. 1994 मध्ये मुंबईत आलेल्या केके यांना संगीतकार-गायक लेस्ली लेवीस यांनी संधी दिली. एकाच वर्षी प्रदर्शित झालेल्या केके यांच्या ‘पल’ आणि ‘तडप तडप के’ या गाण्यांनी अभूतपूर्व यश मिळविला.