Vikram: बॉयकॉट म्हणजे काय रे भाऊ? ट्विटर ट्रेंडवर साऊथ सुपरस्टारचं अजब उत्तर

प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत विक्रमला सोशल मीडियावरील बॉयकॉट (Boycott Bollywood) ट्रेंडबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने दिलेलं अजब उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Vikram: बॉयकॉट म्हणजे काय रे भाऊ? ट्विटर ट्रेंडवर साऊथ सुपरस्टारचं अजब उत्तर
ट्विटर ट्रेंडवर साऊथ सुपरस्टारचं अजब उत्तर
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 30, 2022 | 9:08 AM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विक्रम (Vikram) सध्या त्याच्या आगामी ‘कोब्रा’ या तमिळ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत विक्रमला सोशल मीडियावरील बॉयकॉट (Boycott Bollywood) ट्रेंडबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने दिलेलं अजब उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘बॉयकॉट म्हणजे काय, हे माहीत नाही’ असं विक्रम म्हणाला. ‘कोब्रा’च्या (Cobra) प्रमोशनसाठी विक्रम गेल्या काही दिवसांपासून दक्षिणेतील विविध शहरांना भेट देत आहे. हैदराबादमध्ये असताना त्याला बॉयकॉट ट्रेंडविषयी असता, त्यावर थेट उत्तर देणं त्याने टाळलं.

काय म्हणाला विक्रम?

“तुम्ही कोणती भाषा बोलताय मला माहीत नाही. बॉयकॉट म्हणजे काय? मला बॉय म्हणजे काय, गर्ल म्हणजे काय आणि कॉट म्हणजे काय हे माहीत आहे. पण बॉयकॉट म्हणजे काय ते माहीत नाही”, असं उत्तर विक्रमने दिलं. विक्रमने दिलेल्या या उत्तरावरून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांना बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागला. आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’पासून ही सुरुवात झाली. आमिरच्या जुन्या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. या ट्रेंडचा फटका बॉक्स ऑफिस कमाईवरही झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर अक्षय कुमारचा रक्षाबंधन, तापसी पन्नूचा दोबारा, विजय देवरकोंडाचा लायगर आणि आलिया भट्टचा डार्लिंग्स या चित्रपटांविरोधातही बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला. या ट्रेंडवरील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विक्रमच्या ‘कोब्रा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अजय ग्यानमुत्थू यांनी केलं असून यामध्ये त्याच्यासोबत श्रीनिधी शेट्टी आणि इरफान पठाण यांच्याही भूमिका आहेत. इरफान यामध्ये पोलिसाची भूमिका साकारणार आहे. ‘डार्लिंग्स’मध्ये झळकलेला रोशन मॅथ्यूसुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या बिग बजेट चित्रपटाला ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलं आहे. कोब्रानंतर विक्रम मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटातही झळकणार आहे. यामध्ये ऐश्वर्या रायसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.