Brahmastra: ‘काठीने की रॉडने..’; ब्रह्मास्त्रच्या यशावर विवेक अग्निहोत्रींचं उपरोधिक टि्वट

'ब्रह्मास्त्र'च्या यशावर विवेक अग्निहोत्री असं का म्हणाले?

Brahmastra: काठीने की रॉडने..; ब्रह्मास्त्रच्या यशावर विवेक अग्निहोत्रींचं उपरोधिक टि्वट
Vivek Agnihotri on Brahmastra
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Sep 19, 2022 | 6:47 PM

सध्या बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटाचाच बोलबाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचतोय. या वर्षभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ ठरतोय. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाने विवेक अग्निहोत्रींच्या (Vivek Agnihotri) ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटालाही मागे टाकल्याचं वृत्त आहे. ‘ब्रह्मास्त्र’ने कमाईचा 200 कोटींचा आकडा पार केला आहे. यावरूनच द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी उपरोधिक ट्विट केलंय. त्यांचं हे ट्विट सध्या ट्रेंडमध्ये आलं आहे.

‘ब्रह्मास्त्र’ने द काश्मीर फाईल्सवर मात केल्याच्या बातम्यांचे स्क्रीनशॉट्स विवेक यांनी ट्विटरवर शेअर केले. त्यासोबतच लिहिलं, ‘हाहाहाहा.. मला माहीत नाही त्यांनी कशाने ‘द काश्मीर फाईल्स’ला धोबीपछाड दिली, काठीने, रॉडने, हॉकीने, दगडाने की एके 47 ने की.. पैसे देऊन पीआरने आणि इन्फ्लुएन्सर्सने? बॉलिवूड चित्रपटांना एकमेकांशी स्पर्धा करू द्या. आम्हाला एकटं सोडा. मी त्या मूर्खपणाच्या शर्यतीत नाही. धन्यवाद’. या ट्विटमध्ये त्यांनी ‘नॉट बॉलिवूड’ (बॉलिवूड नाही) असा हॅशटॅगसुद्धा दिला.

ब्रह्मास्त्रने दुसऱ्या आठवड्याच्या रविवारी 17 कोटींची कमाई केली. देशभरात रणबीर-आलियाच्या या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर जगभरात या चित्रपटाची कमाई 350 कोटींच्या घरात झाली आहे. द काश्मीर फाईल्सने जगभरात 340 कोटींची कमाई केली होती.

ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा बजेट 410 कोटी असल्याचं वृत्त होतं. मात्र त्यावरून रणबीरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं. “ब्रह्मास्त्रच्या बजेटबद्दल मी अनेक वृत्त वाचत आहे. पण ब्रह्मास्त्रचा हा बजेट फक्त एकाच चित्रपटासाठी नसून त्याच्या तीन भागांसाठी आहे”, असं तो म्हणाला.