अर्जुन-मलायका, जान्हवी-शिखरच्या रिलेशनशिपवर वडील बोनी कपूर नाराज? म्हणाले “आजकालची मुलं..”

बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर हा अभिनेत्री मलायका अरोराला डेट करतोय. तर मुलगी जान्हवी कपूर ही शिखर पहाडियाला डेट करतेय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते मुलांच्या रिलेशनशिपविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.

अर्जुन-मलायका, जान्हवी-शिखरच्या रिलेशनशिपवर वडील बोनी कपूर नाराज? म्हणाले आजकालची मुलं..
मुलांच्या नात्याबद्दल काय म्हणाले बोनी कपूर?
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2024 | 1:42 PM

पालकत्व हे अनेकांसाठी आव्हानात्म असतं. मात्र हे आव्हान अधिक कठीण तेव्हा होतं जेव्हा तुमची मुलं सतत प्रकाशझोतात असतात. निर्माते बोनी कपूर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. मुलांच्या डेटिंग आयुष्याबद्दल बोनी कपूर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की ते नेहमीच मुलांच्या पार्टनरला संमती दर्शवत नाहीत. मात्र स्वत:च्या आवडीनिवडीसुद्धा त्या मुलांवर थोपवण्याचा प्रयत्न करत नाहीत. बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर हा वयाने 12 वर्षांनी मोठी असलेल्या मलायका अरोराला डेट करतोय. तर मुलगी जान्हवी कपूर ही राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियाला डेट करतेय.

‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले, “मला त्यांच्या डोक्यात एखादी गोष्ट भरवावी लागेल अशी परिस्थिती आजवर तरी उद्भवली नाही. पण मला अर्जुन, जान्हवी आणि खुशीच्या काही रिलेशनशिप्सविषयी समस्या होती. पण मी त्यांच्या परीने त्यांनाच या समस्या सोडवण्यास सांगितलं. मी नेहमी अशाच प्रकारे गोष्टी हाताळल्या आहेत.”

मुलांना रिलेशनशिपविषयी काय सल्ला देणार असा प्रश्न विचारला असता ते पुढे म्हणाले, “हे त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे. मी त्यांना एकदा किंवा दोन वेळा बोलू शकतो. माझं मत मांडू शकतो. पण गोष्ट अशी आहे की आजकालची मुलं ही आधीच्या पिढीपेक्षा फार समजूतदार आणि जलद गतीने काम करणारी आहे. तुम्ही ज्याप्रकारे विचार करता, तसाच त्यांनी करावा याची बळजबरी तुम्ही त्यांच्यावर करू शकत नाही.”

याच मुलाखतीत बोनी कपूर हे जान्हवीच्या बॉयफ्रेंडविषयीही व्यक्त झाले. जान्हवी ही शिखर पहाडियाला डेट करतेय. या दोघांनी उघडपणे आपल्या रिलेशनशिपची कबुली दिली नसली तरी अनेकदा जान्हवी-शिखरला एकत्र पाहिलं गेलं. शिखर हा जान्हवीचा कधीच एक्स बनू शकत नाही, असं बोनी कपूर या मुलाखतीत म्हणाले. किंबहुना जेव्हा जान्हवी आणि त्याचं ब्रेकअप झालं होतं, तेव्हासुद्धा शिखर माझ्याशी खूप मैत्रीपूर्ण वागत होता, असं बोनी कपूर यांनी सांगितलं.

शिखर पहाडिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीर आणि शिखर हे भाऊ-भाऊ आहेत. जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे. त्यामुळे शाळेपासूनच दोघं एकमेकांना ओळखतात.