आईवडिलांबद्दल अश्लील टिप्पणी करणाऱ्या रणवीर अलाहबादियावर भडकले बोनी कपूर; म्हणाले..

युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाच्या अश्लील टिप्पणीवरून सर्वच स्तरांतून तीव्र संताप व्यक्त होतोय. प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनीसुद्धा रणवीरवर टीका केली आहे. सेल्फ सेन्सॉरशिप असायला हवी, असं त्यांनी म्हटलंय.

आईवडिलांबद्दल अश्लील टिप्पणी करणाऱ्या रणवीर अलाहबादियावर भडकले बोनी कपूर; म्हणाले..
Boney Kapoor and Ranveer Allahbadia
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 13, 2025 | 10:31 AM

कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोवरून मोठा वाद सुरू आहे. या शोमध्ये समयसोबतच इतर परीक्षकांवरही पोलिसांत तक्रार आणि एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एका एपिसोडमध्ये प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाने एका स्पर्धकाला आईवडिलांच्या संभोगाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. यावरून सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या एपिसोडवर आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर आता निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर यांनीसुद्धा रणवीर अलाहबादियावर टीका केली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सामाजिकदृष्ट्या अमान्य वक्तव्यांना समर्थन देत नाही, असं त्यांनी म्हटलंय. याविषयी ते पुढे म्हणाले, “त्याने असं काही केलंय ज्याचं मी अजिबात समर्थन करू शकत नाही. काही मर्यादा पाळल्या पाहिजेत. सेल्फ-सेन्सॉरशिपसुद्धा असायला हवी. आपल्या घरात तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागता, बोलता. पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा सामाजिक ठिकाणी तुम्ही बोलताना सावध असायला हवं. तुम्ही शिस्तीचं पालन करायला हवं.”

दरम्यान ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या वादग्रस्त शोचे सर्व 18 भाग हटवण्याबाबत युट्यूबला महाराष्ट्र सायबर विभागाने पत्र लिहिलं आहे. तसंच, यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनीही अश्लील टीका टिप्पणी केली असल्यास त्यांनाही आरोपी करण्यात येणार असल्याचंही सायबर विभागाने स्पष्ट केलंय. याप्रकरणात तन्मय भट, राखी सावंत, उर्फी जावेद, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि दीपक कलाक सह इतर सहभागी झालेल्या व्यक्तींनाही समन्स बजावले आहेत.

‘इंडियाज गॉट लेटेंट’चे एकूण 18 भाग युट्यूबवर प्रसिद्ध झाले होते. हे सर्व भाग हटविण्याबाबत युट्यूबला पत्र पाठविण्यात आल्याचं सायबर विभागाने सांगितलंय. तसंच प्रेक्षकांना यात साक्षीदार केलं जाणार असल्याचंही सायबर विभागाने सांगिलंय. कॉमेडियन समय रैनाच्या या शोमध्ये वेगवेगळ्या श्रेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींना परीक्षक म्हणून बोलावण्यात येतं. अशाच एका भागामध्ये युट्यूबर रणवीर अलाहबादिया आणि अपूर्वा मखिजा यांना बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला आई-वडिलांबाबत अश्लील प्रश्न विचारत आक्षेपार्ह विधानं केली होती. याप्रकरणी खास पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू आहे.