‘हे खूप भयानक…’; गौरी खानच्या रेस्टॉरंटमधील भेसळयुक्त पनीरबाबत शेफची प्रतिक्रिया चर्चेत

गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये भेसळयुक्त पनीर वापरलं जात असल्याच्या दाव्यावर आता प्रसिद्ध शेफ विकास खन्नाने प्रतिक्रिया दिली आहे. कंटेक क्रिएटर सार्थक सचदेवाने गौरी खानच्या रेस्टॉरंटबाबत व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात त्याने पनीरची चाचणी केली होती.

हे खूप भयानक...; गौरी खानच्या रेस्टॉरंटमधील भेसळयुक्त पनीरबाबत शेफची प्रतिक्रिया चर्चेत
Vikas Khanna, Gauri Khan and Sarthak Sachdeva
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 21, 2025 | 12:56 PM

अभिनेता शाहरुख खानची पत्नी आणि इंटेरिअर डिझायनर गौरी खानचं रेस्टॉरंट ‘टोरी’ (Torii) हे गेल्या काही दिवसांपासून भेसळयुक्त पनीरमुळे चर्चेत आलं आहे. एका युट्यूबरने गौरीच्या या रेस्टॉरंटमध्ये भेसळयुक्त पनीर वापरल्याचा आरोप केला. कंटेट क्रिएटर सार्थक सचदेवाने त्याच्या एका व्हिडीओमध्ये विविध सेलिब्रिटी रेस्टॉरंटमधील पनीर मागवून त्यावर आयोडिन टेस्ट केली होती. या टेस्टनंतर ‘टोरी’मधील पनीरचा रंग बदलला होता, तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या रेस्टॉरंटमधील पनीरचा रंग जसाच्या तसाच राहिला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. सार्थकच्या या व्हिडीओनंतर गौरी खानच्या रेस्टॉरंटकडून स्पष्टीकरणसुद्धा देण्यात आलं होतं. आता प्रसिद्ध शेफ विकास खन्नाने याप्रकरणी आपलं मत मांडलं आहे. विकासने कंटेट क्रिएटरवर चुकीची माहिती पसरवल्याच आरोप करत त्याला फटकारलं आहे.

विकासने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये यासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने लिहिलं, ‘मी गेल्या अनेक दशकांपासून स्वयंपाक करता करता अन्नाच्या विज्ञानाबाबतही काम करतोय. परंतु स्वत:ला अन्न शास्त्रज्ञ म्हणवणाऱ्या युट्यूबरने अशा पद्धतीची भयानक चुकीची माहिती पसरवल्याचं मी आजवर कधी पाहिलं नव्हतं. बटाटे, तांदूळ, ब्रेड, कॉर्नफ्लोअर, मैदा आणि कच्ची केळी या घटकांवर प्रतिक्रिया देताना आयोडीन रंग बदलतो. या घटकांचा वापर (आणि अशा प्रकारच्या प्रतिक्रिया) हे क्रॉस कन्टॅमिनेशनमध्येही (एका व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाहून दुसऱ्या व्यक्तीकडे हानिकारक जीवाणूंचं हस्तांतरण) होऊ शकतं. अशा अपात्र लोकांना गांभीर्याने घेतलं जातं, ही भयानक बाब आहे.’

कंटेट क्रिएटर सार्थने त्याच्या व्हिडीओसाठी आधी बॉबी देओल, शिल्पा शेट्टी, गौरी खान, विराट कोहली यांसारख्या सेलिब्रिटींच्या रेस्टॉरंटमधून पनीरचे डिशेस मागवले. या डिशेसवर त्यांनी आयोडिन केल्यानंतर गौरीच्या ‘टोरी’मधील पनीरचा रंग काळा आणि निळा झाला. त्यावरून सार्थकने दावा केला की हे भेसळयुक्त किंवा बनावट पनीर आहे. त्याच्या या व्हिडीओवरून चर्चा सुरू झाल्यानंतर गौरीच्या रेस्टॉरंटने अधिकृतरित्या स्पष्टीकरण दिलं. ‘टोरीमध्ये भेसळयुक्त किंवा बनावटी पनीर वापरलं जात असल्याच्या वृत्ताने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. आयोडीन चाचणीमध्ये पनीर शुद्ध आहे की बनावट हे स्पष्ट होत नाही तर त्यातील स्टार्चची उपस्थिती दिसून येते. सोया-आधारित घटक असलेल्या सर्व पदार्थांसाठी ही प्रतिक्रिया अपेक्षित आहे. आम्ही उत्पादन खरेदी करण्यापासून ते ग्राहकांच्या प्लेटमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नापर्यंत प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेची तपासणी करतो. ग्राहकांना उत्कृष्ट अन्न देण्याच्या वचनबद्धतेवर आम्ही आजही ठाम आहोत’, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पनीरसाठी आयोडीन चाचणी?

पनीरमध्ये स्टार्चची भेसळ आहे का हे तपासण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे आयोडीन चाचणी. आयोडीन टाकल्यावर जर पनीरचा रंग निळा किंवा काळा होत असेल तर त्याचा अर्थ त्याच स्टार्चची उपस्थिती आहे. ज्यामुळे ते पनीर भेसळयुक्त असू शकतं हे त्यातून सूचित होतं. शुद्ध पनीर हे दुधाच्या प्रथिनांपासून बनवलं जातं आणि आयोडीनने प्रक्रिया केल्यावर ते निळं किंवा काळं होत नाही. ही चाचणी करण्यासाठी पनीरच्या तुकड्यात आयोडीन सोल्युशनचे (टिंचर) काही थेंब घाला. त्यानंतर रंग बदलला नाही तर ते शुद्ध असल्याचं सिद्ध होतं आणि रंग निळा किंवा काळा झाला तर त्यात स्टार्च असल्याचं दिसून येतं. परंतु ही चाचणी पूर्णपणे योग्य मानली जात नाही.