
Vicky Kaushal: अभिनेता विकी कौशल गेल्या काही दिवसांपासून ‘छावा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिनेत्याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्याने साकारलेल्या भूमिकेला डोक्यावर घेतलं आहे. अशात शिवजयंतीचं निमित्त साधत अभिनेता रायगडावर उपस्थित राहिला आणि भावना व्यक्त केल्या. शिवाय अभिनेत्याने ‘छावा’ सिनेमाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.
सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत विकी कौशल म्हणाला, मी स्वतःला सौभाग्यशाली समजत आहे. मला याठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या संर्वांना शुभेच्छा… रायगडावर यायचं एक स्वप्न होतं… दर्शनाची ओढ होती… आज महाराजांचे आशीर्वाद मिळालेत म्हणून चांगलं वाटत आहे… असं अभिनेता म्हणाला.
पुढे विकीला ‘छावा’ सिनेमातील शेवटचा सीन पाहून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलं.. असं विचारण्यात आलं. यावर विकी म्हणाला, ‘भूमिका साकारण्यासाठी प्रचंड मेहनत लागली… छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या यातना सोसल्या आहेत, त्यापुढे आमची मेहनत काही नाही. त्यामुळे महाराजांची कथा जगापुढे मांडण्याची गरज होती. महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण जगभरात छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पोहोचवणं गरजेचं होतं… हाच आमचा एक उद्देश होता…’
स्वतःला महाराजांच्या भूमिकेत कसं वाहून घेतलं… असं देखील अभिनेत्याला विचारण्यात आलं. विकी म्हणाला, ‘छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कोणी वाचलं तरी आयुष्य बदलेल. मला तर लक्ष्मण उतेकर यांनी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी दिली. बरंच काही त्यांच्याकडून शिकायला मिळालं आहे.’ असं अभिनेता म्हणाला. सध्या फक्त आणि फक्त विकी कौशल आणि ‘छावा’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.