
‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा विजेता सूरज चव्हाणने काही दिवसांपूर्वीच आपल्या मामाची मुलगी संजनासोबत विवाह केला आणि त्याचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. आता त्याच सीझनमधील आणखी एक लोकप्रिय स्पर्धक घनश्याम दरोडे उर्फ ‘छोटा पुढारी’ लग्नाच्या तयारीत व्यग्र झाला आहे. घन:श्यामने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवरुन त्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले. आता खरंच छोटा पुढारी लग्न करतोय का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
नेमकं काय घडलं?
घन:श्यामने स्वतःच्या इंस्टाग्रामवर हळदीच्या विधीचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत तो पारंपरिक हळद समारंभ करताना दिसत आहे. तो पाटावर बसलाय आणि त्याची आई त्याला प्रेमाने हळद लावते. या व्हिडीओसोबत घनश्यामने मजेशीर कॅप्शन लिहिली आहे, “नवरदेव झालो ना राव… हळद लागली एकदाची… माझं पण ठरलं बरं का… यायला लागतंय!” त्यानंतर व्हिडीओमध्ये तो शेरवानी-बुट घेण्यासाठी दुकानात फिरतानाही दिसतोय. म्हणजेच लग्नाची तारीख जवळ आली आहे, असे पाहून वाटते. पण व्हिडीओच्या शेवटी सत्य समोर येते.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर घन:श्यामचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. काहींनी त्याला शुभेच्छा दिल्या तर काहींनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. एका यूजरने, “किती फूटाची आहे नवरी?” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, “बाळ आता मंडपात येणार! असे म्हटले आहे. इतर काही यूजर्सने, “अरे घनश्या, बालविवाह करू नकोस रे!”, “बालविवाहाची केस होईल बाबा!”, “कायद्याने गुन्हा आहे राव, सावध!” अशा मजेशीर कमेंट्स केल्या आहते.
घन:श्यामच्या या लग्नघाईमुळे ‘बिग बॉस मराठी ५’ ची आठवण पुन्हा ताज्या झाली आहे. सूरज चव्हाणनंतर आता ‘छोटा पुढारी’ही नव्या इनिंगला सुरुवात करणार, पण या नवरदेवाला पाहून चाहते मात्र हसून हसून लोटपोट झाले आहेत.