
हल्लीच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये केस पांढरे होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. कधीकाळी वाढत्या वयाचं लक्षण मानली जाणारी ही गोष्ट आता कमी वयातही सर्रास पाहायला मिळते. या समस्येमुळे अनेक तरुण-तरुणी चिंतेत असतात. यामुळे अनेक जण केस काळे करण्यासाठी विविध उपाय शोधत असतात. त्यातच आता एका चीनी अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक मोठा दावा केला आहे. या दाव्याने सर्वांचेचे लक्ष वेधून घेतले आहे. पांढरे झालेले केस पुन्हा काळे करण्यासाठी ती एक इंजेक्शन घेत आहे. याचा तिला मोठा फायदा होत आहे.
आजकाल सोशल मीडियावर एका चीनी अभिनेत्रीमुळे एक नवीनच चर्चा सुरू झाली आहे. 37 वर्षांच्या अभिनेत्री गुओ टोंगने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट शेअर करत धक्कादायक दावा केला आहे. गुआ टोंगने आपल्या पांढऱ्या केसांवर उपचार करण्यासाठी थेट इंजेक्शन घेण्यास सुरुवात केली आहे. तिच्या मते, हे इंजेक्शन पांढऱ्या केसांचा रंग पुन्हा नैसर्गिक काळा करतात. पण हे खरंच शक्य आहे का? यामागचं विज्ञान आणि वस्तुस्थिती काय आहे, ते जाणून घेऊया.
गुओ टोंगने चीनच्या ‘Douyin’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला. मी गेल्या कित्येक वर्षापासून पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहे. माझे पांढरे केस अनुवांशिक नाहीत. हे तणाव, मानसिक दबाव आणि अनियमित जीवनशैलीमुळे झाले आहेत. पण काही महिन्यांपासून मी यावर उपाय म्हणून इंजेक्शनचा एक कोर्स सुरू केला आहे. आतापर्यंत मी याचे 10 इंजेक्शन घेतले आहेत, असे गुआ म्हणाली.
मला अनेकजण विचारतात की याचा फायदो होतो का? मी तीन आठवड्यांसाठी बाहेर गेल्याने माझे काही सेशन चुकले. तरीही माझ्या डॉक्टरांनी घेतलेल्या फोटोमध्ये नैसर्गिक पद्धतीने काही नवीन केस हळूहळू काळे होताना पाहायला मिळत होते. माझे केस पांढरे झाल्याने मी खूप अस्वस्थ झाले होते. मानसिकरित्या खूप खचले होते. मात्र मी हा उपाय केल्याने मला फायदा झाला, असे गुआने म्हटले. यात तिने उपचाराचा खर्च सांगितलेला नाही.
शंघायमधील ‘युएयांग हॉस्पिटल’च्या डॉक्टरांनुसार, हे इंजेक्शन पारंपरिक चीनी औषध पद्धतीवर आधारित आहे. यात व्हिटॅमिन B12 चा एक प्रकार, adenosylcobalamin, वापरला जातो. डॉक्टरांच्या मते, हे औषध शरीरातील मेलानिन (Melanin) तयार करण्यास प्रोत्साहन देते. मेलानिन हे एक नैसर्गिक रंगद्रव्य आहे, जे आपल्या केस, त्वचा आणि डोळ्यांना रंग देते. केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जी मेलानोसाइट्स (Melanocytes) नावाच्या पेशींचे काम हळूहळू कमी झाल्यामुळे होते.
काही तज्ञांच्या मते, या उपचारात ‘exosomes’ चा वापर करून केसांच्या मुळांमध्ये मायक्रो-नीडलिंगद्वारे इंजेक्शन दिले जातात, ज्यामुळे केसांच्या रंगासाठी जबाबदार असलेल्या मेलानोसाइट स्टेम पेशी पुन्हा सक्रिय होऊ शकतात.
सध्या या उपचारांबाबत पुरेसे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. काही निवडक प्रकरणांमध्ये केस किंचित काळे झाल्याचे दिसून आहे. पण हे उपचार सर्वांसाठीच सुरक्षित असतील अशी कोणतीही खात्री नाही. तज्ज्ञांच्या मते, ही पद्धत खूप खर्चिक आहे आणि ती सर्वांसाठी विश्वसनीय मानली जाऊ शकत नाही. त्यामुळेच जर तुम्ही अशा कोणत्याही उपचाराचा विचार करत असाल, तर तो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि अत्यंत सावधगिरीनेच घेणे महत्त्वाचे आहे. केवळ सोशल मीडियावरील दाव्यांवर विश्वास ठेवणे योग्य नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)