CJP Protest Mumbai : प्रेमानेच त्याला घरी पाठवायचंय, विशाल ददलानीचा सीजेपी आंदोलनाला पाठिंबा
Vishal Dadlani in CJP Protest Mumbai : शिवाजी पार्कबाहेर सीजेपीचं आंदोलन सुरू असून विशाल ददलानीनं अभिजीत दिपकेच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

सीजेपीनं मुंबईत आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्र सरकारनं शिवाजी पार्कमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. परिणामी, सीजेपीनं बाहेर आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सुरू असलेल्या आंदोलनात नसिरुद्दीन शाहसुद्धा सहभागी झाले. तसंच सुप्रसिद्ध गायक विशाल ददलानीसुद्धा या आंदोलनात सहभागी झाला. त्यानं ‘गो ज्ञानू गो‘ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला.
काय म्हणाला विशाल ददलानी?
विशाल दादलानी म्हणाला की, ‘आयुष्यात पहिल्यांदा गांधी जयंती इथे साजरी करतोय. कधी कधी असं वाटतं की, प्रकाश कमी होत चाललाय. पण, तसं नाहीये, तुमच्यामुळे संपूर्ण आकाश प्रकाशमय झालंय. भारताचं भविष्य दिसतंय. दिल्लीमध्ये जाऊन अभिजीतला सपोर्ट करण्याची संधी मला मिळाली नाही. पण, आज इथे येण्याची संधी मिळाली. हे आंदोलन चालू राहील, तोपर्यंत गो ज्ञानू गो…करले थोडी शरम ज्ञानू…गो ज्ञानू गो. आज गांधी जयंती आहे, जे बोलायचं ते प्रेमानं बोला. प्रेमानेच त्याला घरी पाठवायचंय.
कॉकरोच जनता पक्षानं मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. मुंबई पोलिसांनी सीजेपीला शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्याची परवानगी नाकारली. यानंतर, कॉकरोच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्कबाहेर आंदोलन सुरू केलं. कॉकरोच पक्षानं तीन मागण्या केल्या आहेत, त्यापैकी सर्वात प्रमुख मागणी म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा. ज्ञानेश कुमार राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही, असं सीजेपीनं आधीच जाहीर केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीजेपीनं सुरू केलेल्या या मोहिमेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण घटनेला एक खोटा मेसेज पसरवण्याचा प्रयत्न म्हटलं आहे. ते म्हणाले, ‘सर्वप्रथम, मला हे स्पष्ट करायचं आहे की, त्यांचा संपूर्ण कट उघडकीस आला आहे. तीन निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांचा खोटा मेसेज उघड झाला आहे. असं असूनही, हा खोटा वृत्तांत पुढे नेण्याचं प्रयत्न केले जात आहेत. ते यात यशस्वी होणार नाहीत.’
