Coldplay बँडच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी; सोशल मीडियावर पोस्ट केलं निवेदन

| Updated on: Oct 05, 2022 | 6:20 PM

तुम्हीसुद्धा 'कोल्डप्ले' या रॉक बँडचे चाहते असाल, तर 'ही' बातमी नक्की वाचा!

Coldplay बँडच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी; सोशल मीडियावर पोस्ट केलं निवेदन
Chris Martin
Image Credit source: Instagram
Follow us on

‘माय युनिव्हर्स’ (My Universe) हे गाणं तुम्ही ऐकलं असाल, तर ‘कोल्डप्ले’ (Coldplay) हा रॉक बँड तुम्हाला नक्कीच माहीत असेल. 1996 मध्ये या ब्रिटीश रॉक बँडची स्थापना झाली. मुख्य गायक आणि पियानिस्ट ख्रिस मार्टीन, गिटारिस्ट जॉनी बकलँड, बासिस्ट गे बेरीमॅन, ड्रमर विल चॅम्पियन आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर फिल हार्वे या पाच जणांचा हा लोकप्रिय बँड आहे. या बँडचा मुख्य गायक ख्रिस मार्टीनचा (Chris Martin) जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. ख्रिस आणि कोल्डप्लेच्या चाहत्यांसाठी अत्यंत निराशाजनक बातमी आहे. ख्रिस मार्टीनला फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग झाला आहे. त्यामुळे बँडने आगामी ब्राझीलमधला शो पुढे ढकलला आहे. ट्विटरवर पोस्ट लिहित बँडकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

ख्रिसला पुढील तीन आठवडे विश्रांती घेण्याचा कठोर आदेश डॉक्टरांनी दिला आहे. या आव्हानात्मक काळात ख्रिसच्या आरोग्याला प्राधान्य देणं महत्त्वाचं असल्याचं बँडने स्पष्ट केलं. “वैद्यकीय विश्रांतीनंतर ख्रिस बरा होऊन परतेल अशी आम्हाला आशा आहे. त्यानंतर लवकरच आम्ही दौरा पुन्हा सुरू करू”, असं या पोस्टमध्ये म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

2023 च्या सुरुवातीपर्यंत या बँडचे शो पुढे ढकलण्यात आले आहेत. रियो डी जनेरियो आणि साओ पाऊलो यांच्यासह इतर आठ शोजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. कोल्डप्ले हा बँड या वर्षी मार्च महिन्यापासून वर्ल्ड टूरवर आहे. कोस्टा रिकामध्ये त्यांच्या या ग्लोबल टूरची सुरुवात झाली होती.

सध्या दक्षिण अमेरिकेत या बँडचे शोज सुरू होते. ‘म्युझिक ऑफ द स्फिअर्स’ असं नाव या वर्ल्ड टूरला देण्यात आलं होतं. कोल्डप्ले बँडच्या नवव्या अल्बमच्या नावावरून टूरला हे विशेष नाव देण्यात आलं. या वर्ल्ड टूरचा भाग म्हणून 24 सप्टेंबर रोजी या बँडने सँटियागो आणि चिले याठिकाणी परफॉर्म केलं होतं.

कोल्डप्लेच्या चाहत्यांनी जर त्यांच्या आगामी कॉन्सर्टची तिकिटं बुक केली असतील, तर ती तिकिटं 2023 मध्ये होणाऱ्या कॉन्सर्टसाठीही लागू होतील. या तिकिटांसाठी त्यांनी रिफंड ऑप्शनसुद्धा ठेवला आहे. कॉन्सर्टची तिकिटं स्वत:हून रद्द केल्यास त्याचे पैसेही चाहत्यांना परत मिळतील.