माझे कपडे, मंदिर, मुलाची पुस्तकं सर्व तिथेच पण..; दलजितच्या पतीचा लग्न स्वीकारण्यास अमान्य

दलजीतने 10 मार्च 2023 रोजी बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. हे दोघांचंही दुसरं लग्न होतं. याआधी दलजीतने अभिनेता शालीन भनोतशी पहिलं लग्न केलं होतं. शालीन आणि दलजीत यांना एक मुलगा आहे. तर निखिललाही पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत.

माझे कपडे, मंदिर, मुलाची पुस्तकं सर्व तिथेच पण..; दलजितच्या पतीचा लग्न स्वीकारण्यास अमान्य
Dalljiet Kaur and Nikhil Patel
Image Credit source: Instagram
| Updated on: May 27, 2024 | 12:47 PM

काही महिने मौन बाळगल्यानंतर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजित कौर आता तिच्या पतीविरोधात थेट आरोप करत आहे. दलजितने काही महिन्यांपूर्वीच निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं होतं. लग्नानंतर ती निखिल आणि मुलासोबत केन्याला स्थायिक झाली होती. मात्र लग्नाच्या दहा महिन्यांतच ती मुलासह भारतात परतली आणि सोशल मीडियावरून पतीसोबतचे सर्व फोटो डिलिट केले. फोटो डिलिट केल्यानंतर सोशल मीडियावर दलजितच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यावेळी तिने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. आता खुद्द दलजितने निखिलवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर तो लग्नही स्वीकारण्यास तयार नसल्याचं तिने म्हटलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दलजितने पोस्ट लिहिली होती. त्यानंतर काही वेळाने तिने ही पोस्ट डिलिट केली.

दलजित सध्या मुलासोबत भारतात राहत असून निखिल केन्यामध्येच आहे. स्वत:चा ब्रायडल लूकमधील फोटो शेअर करत दलजितने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘माझे कपडे तिथेच आहेत, माझा चुडा तिथे आहे, माझं मंदिर, माझ्या सगळ्या गोष्टी तिथेच आहेत. किंबहुना माझ्या मुलाचे कपडे, पुस्तकं आणि वडिलांवर असलेली त्याची आशासुद्धा तिथेच आहे. ते माझं सासर आहे, मी केलेली पेंटिंग तिथे आहे, पण माझा पती म्हणतोय की ते घर माझं नाही. तो म्हणतोय की आम्ही कधी लग्नच केलं नाही. तो माझा पती नाही का? तुम्हाला काय वाटतं? निखिल माझा पती नाही का? आम्ही लग्न केलं नाही का?’

आणखी एका पोस्टमध्ये दलजितने नेटकऱ्यांनाच प्रश्न विचारला आहे. ‘माझं लग्नच झालं नाही का? माझ्या पतीचं घर माझं घर नाही का?’, असा सवाल करत दलजितने ‘हो आणि नाही’ असे दोन पर्याय दिले. दलजितने मार्च 2023 मध्ये बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. याआधी तिने टीव्ही अभिनेता आणि ‘बिग बॉस 16’चा माजी स्पर्धक शालीन भनोतशी लग्न केलं होतं. 2015 मध्ये शालीन आणि दलजित विभक्त झाले. या दोघांना एक मुलगा आहे. तर निखिलचंही दलजितसोबत हे दुसरं लग्न आहे. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुली आहेत.

याआधीच्या पोस्टमध्ये दलजितने निखिलवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप केले होते. ‘तू आता दररोज निर्लज्जपणे तिच्यासोबत सोशल मीडियावर पोस्ट करतोय. लग्नाच्या दहा महिन्यांतच तुझी पत्नी आणि मुलगा भारतात परतले. संपूर्ण कुटुंबीयांचा अपमान झाला. किमान मुलांखातर तरी थोडा आदर बाळगायला पाहिजे होता. किमान सार्वजनिकरित्या तुझ्या पत्नीसाठी तरी थोडा सन्मान बाकी ठेवायला पाहिजे होता. कारण मी इतर बऱ्याच गोष्टींबद्दल मौन बाळगून होते’, असं तिने निखिलचा फोटो शेअर करत लिहिलं होतं.